मुंबई : प्रत्येकाला आपल्या शहराविषयी प्रेम असतं. प्रत्येक शहरात त्या प्रेमाची एक निशाणी असते. मुंबईतील अनेक ठिकाणांवर मुंबईकरांचं अतोनात प्रेम आहे खरं. पण, त्या प्रेमाचं एक प्रतीक आता त्यांना मिळालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारीत भरलेल्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये 'लव Mumbai' हे शिल्प उभारण्यात आलं होतं. या शिल्पाने अनेक मुंबईकरांचं लक्ष वेधलं होत. 


फेस्टिवल संपल्यानंतर हे लाडकं शिल्प कचऱ्यात जाऊ नये, अशी तमाम मुंबईकरांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन एक मोहिम सुरू केली. अखेर या मोहिमेला यश आलं आणि या शिल्पाला जागा सापडली. 


शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आणि हे शिल्प आता वांद्रा रेक्लमेशनच्या समुद्रकिनारी लावलं गेलं आहे. खुद्द आदित्य ठाकरेंनी त्यासंबंधी माहिती दिली आहे. ही जागा म्हणजे तरुणांची आवडती हँग आऊट प्लेस. म्हणूनच या जागेची निवड केली असण्याची शक्यता आहे. 


यासारखी शिल्प आणखी काही ठिकाणी लावणार असल्याचं आदित्य यांनी सांगितलंय. यापुढे लावल्या जाणाऱ्या शिल्पांमधील 'मुंबई' हा शब्द अंधारात प्रकाशित होणारा असेल, असंही ते म्हणालेत. आता नेमक्या कोणत्या ठिकाणी ही शिल्प लावली जाणार आहेत, याची मात्र माहिती मिळालेली नाही. 


नेदरलँडची राजधानी असणाऱ्या अॅमस्टरडॅमच्या 'आय अॅमस्टरडॅम' या शिल्पावरुन मुंबईच्या शिल्पासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.