आजीने किडनी केली नातवाला दान, वाचविले प्राण
सुखाचं आयुष्य मिळतं. तरीही काहीजण तक्रार करतच आयुष्य जगत असतात. काही जण मात्र अडचणींवर मात करत खंबीरपणे आयुष्य जगतात. मुंबईत 67 वर्षीय एका आजीनं आपल्या तरुण नातवाला किडनी दान करुन त्याचं आयुष्य वाचवलंय. विशेष म्हणजे या वयातही आजीबाई कार्यरत आहेत.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : सुखाचं आयुष्य मिळतं. तरीही काहीजण तक्रार करतच आयुष्य जगत असतात. काही जण मात्र अडचणींवर मात करत खंबीरपणे आयुष्य जगतात. मुंबईत 67 वर्षीय एका आजीनं आपल्या तरुण नातवाला किडनी दान करुन त्याचं आयुष्य वाचवलंय. विशेष म्हणजे या वयातही आजीबाई कार्यरत आहेत.
या आहेत 67 वर्षीय धुरपताबाई कारभारी... आपल्या 24 वर्षीय नातवाला त्यांनी किडनी दान केलीय. त्यांना आपल्या नातवाची परिस्थिती बघितली गेली नाही. आता आपलं आयुष्य जगून झालं. आपल्याला फार आयुष्य जगता आलं नाही तरी काय बिघडलं असा सरळसाधा विचार करत किडनीदान करुन नातवाचा पुनर्जन्मच घडवून आणलाय.. नातवाला पूर्वीसारखे चालताना पाहून आजींना चेह-यावरील आनंद लपवता येत नाही..
विशेष म्हणजे किडनी दान केल्यानंतर तिस-या महिन्यात धुरपताबाई पुन्हा आपल्या शेतात काम करण्यासाठी रुजू झाल्या. त्या आजही भाजी विकण्याचा धंदा करतात. त्यांच्या मुलीचा मुलगा असलेला मंगेश पावशे याला वडील नाहीत. आई, बहिण, भाऊ कुणाचाच रक्तगट त्याच्या रक्ताशी जुळत नव्हता. अखेर आजीचा रक्तगट जुळला. आजीनंही मग खुशीनं आपल्या या नातवाला किडनी दानं केलं. डीजे असलेल्या मंगेशला दारु किंवा सिगरेटचं व्यसन नाही. काही वर्षांपूर्वी त्याला अचानक किडनीचा त्रास सुरु झाला. त्याला चालताही येत नव्हतं.. मात्र त्याचवेळी आजी त्याच्यासाठी जणू देवदूत बनून आली..
मंगेशची आजी आजही ठणठणीत आहे.. मात्र जेव्हा केव्हा जग सोडू तेव्हा किडनीरुपात कायम नातवासोबत जिवंत राहू असं आजींना वाटतंय.. जे अनेकांना जमलं नाही ते शेतात राबणा-या आजींनी अवयवदानाबाबतचं महत्त्व कृतीतून यशस्वीपणे पटवून दिलंय..