शिवसेनेचे मुंबई महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर आणखी एक आरोप
शिवसेनेचे मुंबई महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. महाडेश्वर यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देवून निवडणूक लढवल्याचा आरोप वॉर्ड ८७ मधले काँग्रेसचे पराभूत उमेदवार धर्मेश व्यास यांनी केला आहे.
मुंबई : शिवसेनेचे मुंबई महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. महाडेश्वर यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देवून निवडणूक लढवल्याचा आरोप वॉर्ड ८७ मधले काँग्रेसचे पराभूत उमेदवार धर्मेश व्यास यांनी केला आहे.
महाडेश्वर प्राचार्य असलेल्या संभाजी शाळेला महापालिकेचं तर कनिष्ठ महाविद्यालयाला शासनाचे अनुदान आहे. महापालिकेच्या कायद्यानुसार महापालिकेकडून कोणतंही उत्पन्न मिळत असेल, तर नगरसेवक पद रद्द करण्यात येतं. तसंच शालेय कर्मचा-यांना निवडणूक लढवायची असेल तर पूर्वपरवानगी घेऊन रजेवर जाणं आवश्यक असतं. मात्र, निवडणुक काळातही महाडेश्वरांनी पगार घेतल्याचा दावा व्यास यांनी केलाय.
व्यास यांनी महाडेश्वरांच्या विरोधात लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केलीये. नियमबाह्य घरखरेदी केल्याचाही आरोप महाडेश्वरांवर झालाय. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपलं घर बळकावल्याचा आरोप गजानन पंडीत यांनी केला आहे.
आपण पंडित यांच्या घरात भाड्याने राहात असल्याचे महाडेश्वरांनी म्हटलं होतं. दरम्यान, या आरोपांबाबत महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आता काहीही बोलण्यास नकार दिला. महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर या आरोपांना उत्तरं देईल, असं ते म्हणाले.