मुंबई पालिकेत कसे जमणार सत्ता समीकरण?
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागला. पण भाजप-शिवसेनेतलं महाभारत अजून संपलेले नाही.
मुंबई : महापालिका निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागला. पण भाजप-शिवसेनेतलं महाभारत अजून संपलेले नाही. मुंबईकरांनी दोन्ही पक्षांना जवळपास समसमान जागांचा कौल दिल्याने सत्तेचं गणित आणखीच अवघड होऊन बसले आहे. हे सत्ता समीकरण कसं जुळवायचं, अशा पेचात दोन्ही पक्ष अडकलेत.
दोघांचा सत्तेचा दावा...
मुंबईत शिवसेनेचा विजयरथ भाजपनं रोखल्याचे चित्र निकालावरून स्पष्ट झाले. शिवसेनेला 84, भाजपला 82 जागा मिळाल्यात. मात्र, शिवसेनेने म्हटलेय, मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकणार आहे. आमचाच महापौर असल्याचे म्हटले आहे. तर मुंबईत सत्तेत भाजपचे कमळ असेल, असा दावा भाजपने करताना आमच्याकडे अपक्षांचे बळ असल्याचे म्हटलेय. त्यामुळे कोण सत्ता स्थापन करणार याचीच उत्सुकता आहे. दरम्यान, जास्त नगरसेवक (2) असल्याने शिवसेनेला सत्ता स्थापण्याची संधी मिळेल.
मॅजिक फिगर...
84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पण भाजपनेही 31 वरून 82 अशी जोरदार मुसंडी मारली. त्यामुळं सत्तेचं गणित अवघड होऊन बसले आहे. 227 नगरसेवकांच्या महापालिकेत बहुमतासाठी 114 नगरसेवकांची गरज आहे. शिवसेना आणि भाजपला तो आकडा गाठण्यासाठी मनसे, सपा, एमआयएम, अपक्षांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही नाकदु-या काढाव्या लागतील, अशी चिन्हं आहेत. शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी पुन्हा एकत्र येणार का, असा सवालही आता केला जातोय.
शिवसेनेची घोडदौड
आम्ही घासून बिसून नाही, ठासून येणार, असा दावा करणा-या शिवसेनेची विजयी घोडदौड भाजपने रोखली. परळ, लालबाग, वरळी, दादर, माहिम असे बालेकिल्ले शिवसेनेनं जिंकले. बेहरामपाड्यासारख्या भागातही शिवसेनेचा मुस्लिम उमेदवार विजयी झाला. त्यामुळं शिवसेना भवन आणि मातोश्रीबाहेर जल्लोष सुरू झाला.
इथे शिवसेनेला फटका...
पण गिरगावसह उपनगरातल्या गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, मुलुंड भागात शिवसेनेनं जोरदार आपटी खाल्ली. शिवसेनेचे चार आजी माजी महापौर विजयी झाले. पण यशोधर फणसे, तृष्णा विश्वासराव अशा शिवसेनेच्या कारभा-यांसह खासदार राहुल शेवाळेंची पत्नी कामिनी शेवाळे, अनुराधा पेडणेकर, देवेंद्र आंबेरकर असे शिवसेनेचे अनेक दिग्गज निवडणुकीत आडवे झाले. शिवसेनेचा विजयरथ 84 जागांवर अडल्यानं आता पुढं काय करायचं, असा प्रश्न नेतृत्वालाही पडलाय.
काँग्रेसची 51 वरून 31 जागांवर झालेली घसरण, राष्ट्रवादीची 14 वरून 9 अशी पीछेहाट, एआयएमआयएमनं मुंबईत उघडलेलं खातं आणि एमआयएमच्या एन्ट्रीनंतरही सपानं राखलेल्या 6 जागा, ही देखील मुंबईच्या निकालाची वैशिष्ट्यं ठरली. गेल्यावेळी 28 नगरसेवक निवडून आणणा-या मनसेच्या इंजिनाचा वेग अपेक्षेप्रमाणं मंदावला. यावेळी केवळ 7 जागांवर समाधान मानावं लागलं.
धन्युष्याला रेल्वे इंजिन जोडणार का?
राजाला साथ द्या, अशी हाक मनसेनं दिली होती. मुंबईकरांनी केवळ सात जागा राजाच्या मनसेला दिल्या. दादर माहिमचा गेल्यावेळी जिंकलेला गड यावेळी राखता आला नाही. पण तरीही बहुमताचं गणित सोडवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेला मनसेची गरज लागणार असल्यानं इंजिनाच्या डब्यांचा भाव वधारण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेतला हा सत्तेचा चक्रव्यूह कोण आणि कसा भेदणार, याकडं आता सर्वाचं लक्ष लागले आहे.
असे जमणार सत्तेचं गणित?
दरम्यान, सत्तेपासून भाजपला बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच अपक्षांचा भाव वधारला आहे. जर काँग्रेसने वॉकऑऊट करण्याच निर्णय घेतला तर बहुमताचा आकडा शिवसेनेला गाठण्याची कसरत करावी लागणार नाही. तर दुसरीकडे भाजपसोबत राष्ट्रवादी जाणार का, याचीही उत्सुकता आहे. पण तसे होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सावध भूमिका घेऊ शकते. तर दुसरीकडे भाजपने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. अपक्ष गळाला लावून सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करु शकतात. तसेच दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. मात्र, 114 जागांची मॅजिक फिगर गाठणे तसे कठिणच आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपाला जवळजवळ समान जागा आल्यामुळे सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही मोठ्या पक्षांची मदार अपक्ष आणि मनसेवर राहणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि एमआयएमचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा जादुई आकडा 90 पर्यंत खाली येतो. त्यामुळे या आकड्याची जमवाजमव करण्यासाठी शिवसेना आणि भाजप तयारी सुरु आहे.