मुंबई : महानगरपालिकेची आगामी निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केलेय. त्याचवेळी शिवसेनेने ८ प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आपले उमेदवार दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना सामना रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी निवडणुकीआधीच भाजपला शिवसेनेने त्याआधीच दणका दिलाय. प्रभाग समितीच्या निवडणुकीत आठ प्रभागांमध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमने-सामने आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मंगळवारी होणारी स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


पालिकेच्या १७ प्रभागांपैकी आठ प्रभागांच्या अध्यक्षपदाची निवडणूक ७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या प्रभागांमध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता.


दरम्यान, पी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या लोचना चव्हाण यांची बिनविरोध निवड होणार आहे. त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल न केल्याने आता फक्त अध्यक्ष निवडीची औपचारिक घोषणा होणेच बाकी आहे.


स्थायी आणि शिक्षण समिती : आज निवडणूक


स्थायी समितीसाठी शिवसेनेचे यशोधर फणसे आणि काँग्रेसकडून सुनील मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिक्षण समितीसाठी शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर आणि काँग्रेसच्या डॉ. प्रियतमा सावंत यांच्यात लढत होईल.


– सी आणि डी प्रभागामध्ये शिवसेनेतर्फे अनिल सिंह तर भाजपच्या सरिता पाटील रिंगणात आहेत.


– ए, बी आणि ई या प्रभागांसाठी अ‍ॅड. मकरंद नार्वेकर (शिवसेना पुरस्कृत) आणि काँग्रेसच्या शहाना रिझवान खान.


– एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर प्रभागांसाठी शिवसेनेच्या हेमांगी चेंबूरकर आणि काँग्रेसच्या पल्लवी मुणगेकर यांचा अर्ज.


– पी-उत्तर प्रभागामध्ये शिवसेनेचे सुनील गुजर, काँग्रेसचे परमिंदर भामरा तर भाजपचे ज्ञानमूर्ती शर्मा रिंगणात आहेत.


– जी-दक्षिण प्रभाग समितीसाठी शिवसेनेच्या मानसी दळवी तर मनसेच्या हेमलता वांगे


– आर-दक्षिण प्रभागात काँग्रेसचे योगेश भोईर तर भाजपचे मुकेश मिस्त्री


– आर- उत्तर आणि आर-मध्य प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, काँग्रेसचे शिवानंद शेट्टी तर भाजपच्या आसावरी पाटील.