मुंबई : वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस चेकच्या मदतीने ८ लाख २३ हजारांची रक्कम काढल्याची तक्रार एका कंपनीने वरळी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि या तपासादरम्यान यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलं. शेकडो चेक अशाच प्रकारे वटवून लाखो रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. पोलिसांनी आकाश राज मूलचंद ऊर्फ सुनील सिंग, आकाश रामचंदानी, काफी अब्दुल शेख, फैयाझ शेख, आसिफ खान, किशोर कनोजिया, चंद्रकांत नांगरे यांना अटक केली आहे.


आरोपी चंद्रकांत हा कुरिअर बॉय म्हणून काम करत होता. कुरिअरसाठी येणारे चेकचे फोटो काढून तो आसिफला पाठवायचा. फैयाझ खान आणि रामचंदानी यांनी वेगवेगळ्या बँकेत बनावट खाते उघडून चेकबूक घेऊन ठेवले होते. व्हॉटस् अ‍ॅपवरील चेक ज्या बँकेचा असायचा त्या बँकेचा चेक घेऊन आसिफ बनावट चेक बनवायचा. जास्त पैसे टाकून तो बनावट खात्यात टाकायचा आणि मग काफी शेख एटीएममधून त्या बनावट खात्यातून पैसे काढायचा. अशा प्रकारे ही टोळी कंपन्यांची फसवणूक करायची. पोलिसांना यामध्ये मोठं यश मिळालं आहे.