अजित मांडरे, मुंबई : वाहतूक पोलीस विभागात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार कसा चालतो, याचा गौप्यस्फोट एका वाहतूक पोलिसानेच केला आहे. ट्रॅफिक पोलिसांचं लाचखोरीचं रेटकार्डच ठरले आहे, असा सनसनाटी दावा पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, टोके यांनी या लाचखोरीचा पर्दाफाश केला आहे. भ्रष्टाचारात सामील होण्यास नकार दिल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माझा छळ झाला, असा दावाही त्यांनी केलाय. याप्रकरणी येत्या 23 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. 


दरम्यान, भ्रष्टाचारात सहभागी होण्यास नकार दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ होतो, असंही त्यांनी सांगितले.


लाचखोरीचं रेटकार्ड 


– प्रत्येक वाहतूक विभागात दोन हवालदारांची हफ्ता वसुलीसाठी नियुक्ती केली जाते
– बड्या हॉटेल्सकडून, कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगसाठी दरमहा 40 ते 50 हजार रुपयांचा हफ्ता
– कॉर्पोरेट कंपन्यांकडून रस्ते खोदकामाच्या कामासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये महिना हफ्ता
– टीव्ही सीरियल, सिनेमा शूटिंग आणि मोठ्या जाहिरातींचं शूटिंग करणाऱ्यांकडून 50 हजार ते 1 लाख रुपयांचा हफ्ता
– एक्झिबिशन सेंटर, नेस्को, बीकेसी इथल्या मोठ्या आयोजना दरम्यान एका कार्यक्रमाला 1 लाख रुपयांचा हफ्ता
– ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह प्रकरणात 5 ते 10 केसेसचं टार्गेट असतानाही 40 ते 50 केसेस घेतल्या जातात. मात्र कागदोपत्री केवळ 5 ते 10 केसेस दाखवल्या जातात.
– पकडलेल्यांची आर्थिक क्षमता ओळखून त्यांच्याकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले जातात
– मुंबईत बेकायदेशीररित्या धंदा करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून दरमहा 1000 ते 2 हजार रुपयांचा हफ्ता घेतला जातो
– प्रत्येक डॉमिनोज, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट्टची डिलीवरी करणाऱ्या विक्रेत्यांकडून दरमहा 20 ते 25 हजार रुपयांचा हफ्ता
– प्रत्येक टू-व्हिलर शोरुमकडून 5 हजार तर फोर-व्हिलर शोरुम कडून 10 हजारांचा हफ्ता
– प्रत्येक टँकरकडून दिवसाला 100 ते 200 रुपये
– सिमेंट मिक्सर, रेती, विटांचा वापर करणाऱ्या बांधाकाम साईट्सवरुन 25 ते 30 हजार रुपये महिना हफ्ता आकारला जातो
– बेकायदेशीररित्या ओव्हरलोडिंग करणाऱ्या प्रत्येक ट्रककडून दिवसाला 3 ते 4 हजार रुपये हफ्ता
– शाळकरी मुलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्हॅन्सकडून दरमहा 1000 ते 2000 रुपये हफ्ता
– ऑक्ट्राय चुकवून येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून 4 ते 5 हजार रुपये हफ्ता
– बेकायदेशीर पार्किंगमधून वाहन टोईंग करण्याचे कंत्राट हे खासगी कंपन्यांना दिलेले आहे. ताबडतोब गाड्या सोडल्या की त्यांच्याकडून जी रक्कम आकारली जाते, त्यातील 20 रुपये त्या गाडीवरील हवालदाराला आणि उर्वरित रक्कम त्या ट्रॅफिक चौकीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मिळते.