मुंबई : 'युनिव्हर्सल मराठी' आणि 'मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या ३० जानेवारी पासून नवी मुंबईच्या मराठी साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी (नवी मुंबई) येथे ‘माय मुंबई लघुपट महोत्सव’ साजरा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तीन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून यामध्ये लघुपटकारांसाठी पॅनल डिस्कशन, अॅडोब वर्कशॉप, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.


आंतरराष्ट्रीय लघुपटांचा नजराणा...


यावर्षीच्या महोत्सवात सहभागी लघुपटांची एकूण संख्या १३०० पेक्षा जास्त असून ५ उपखंड, ५० हुन अधिक देश असा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यात विशेष म्हणजे १५ वर्षाच्या नवोदितापासून ते ६५ वर्षाच्या अनुभवी लघुपटकारांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवासाठी सोशल अवेरनेस, इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म्स, अॅड फिल्म्स, अॅनिमेशन फिल्म्स, म्युझिक विडीओ, डॉक्युमेंटरी आणि मोबाईल शूट फिल्म्स अश्या एकूण सात वर्गवारी करण्यात आल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म्स या वर्गवारीत लघुपटकारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या लघुपटांची नामांकने (स्क्रीनिंग लिस्ट) २३ जानेवारीपासून वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहेत. 


'प्रभात चित्र मंडळ' यांच्या सहयोगाने दि. ३१ जानेवारीला संध्याकाळी ४ वाजता 'लघुपट : आशय श्रेष्ठ कि तंत्र' ह्या विषयावर पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रकाश कुंटे (सिने दिग्दर्शक), गणेश मतकरी (लेखक आणि सिनेसमिक्षक), सचिन कारंडे (सिने दिग्दर्शक) आणि सिनेसृष्टीतील मान्यवर तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. चित्रपट लेखक-समीक्षक संतोष पाठारे हे या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविणार आहेत. अॅडोब ह्या संस्थेच्या सहयोगाने दि. १ फेब्रुवारीला संध्याकाळी ६:३० वाजता सिनेसृष्टीतील तंत्रज्ञासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यशाळेत तंत्र सल्लागार गुरु वैद्य यांचे कृतीमार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे अध्यक्ष अजित जाधव यांनी दिली.


३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाला सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. १ फेब्रुवारीला होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभासाठी सिनेअभिनेता विजय पाटकर आणि दिग्दर्शक नागेश भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे. विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल. 


या महोत्सवाला सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल पण त्यासाठी तुम्हाला  www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर नाव नोंदणी करणं गरजेचं आहे, अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली.