मुंबई : सत्तेतील भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीही केलेले नाही. आधी जात मग पक्ष असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गंभीर इशारा दिला. वेळप्रसंगी मराठ्यांच्या तलवारी बाहेर येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते नारायण राणेंनी रोखठोक कार्यक्रमात मराठा आरक्षण आणि मराठा मोर्चे यासंदर्भात सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी गेल्या 2 वर्षांत भाजप सरकारनं काहीच प्रयत्न केले नाहीत. हे सरकारचं अपयश आहे, असा घणाघाती हल्ला राणेंनी केलाय.


पूर्वी मराठे तलवारीने लढले, आता विचारांनी लढतोय. पण मराठ्यांनी तलवारी खाली ठेवलेल्या नाहीत. त्या कधीही बाहेर येऊ शकतात, असा गर्भित इशाराही राणेंनी यावेळी दिला. 


आमच्या सरकारच्यावेळी आम्ही समिती गठित केली. माझ्या अध्यक्षतेखाली चांगले काम झाले. मराठा समाज मागास आहे. राज्यात पाहणी करुन अभ्यास केला गेला. मात्र, माझ्या समितीचा अहवाल वाचलाच गेला नाही, असा आरोप राणे यांनी यावेळी केला.  



शिवसेनेचे हालचालींवर लक्ष


दरम्यान, मराठा मोर्चांबाबत आता शिवसेनेत खलबते सुरू झाली आहेत. मुंबईतला मराठा समाजाचा मोर्चा हा दिवाळी आधी आणि दसऱ्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना दसरा मेळाव्यात मराठा मोर्चाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची दाट शक्यता आहे.


उद्धव ठाकरेंनी आज मराठा मोर्चासंबंधी मराठा नेत्यांशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी मराठा मोर्चाच्या हालचालींवर या नेत्यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोर्चाबाबत शिवसेनेनी लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात आली.