मुंबई : लातूर दौऱ्यादरम्यान काढलेल्या सेल्फीनंतर महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय. तसेच पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्याची गरज असताना पंकजा दारु कंपन्यांना पाणी पुरवठा बंद कऱण्याच्या विरोधात असल्याने या मुद्द्यावरुनही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पंकजा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राज्यात भयंकर दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देणे गरजेचे आहे. मात्र पंकजा दारु कंपन्यांना पाणीपुरवठा बंद कऱण्याच्या विरोधात आहेत. सत्तरच्या दशकात महिला नेता मृणालताई गोरे आणि अहिल्याताई रांगणेकर यांनी पाण्याच्या मुद्द्यावरुन जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना पाणीवाली बाई असे नाव मिळाले. मात्र पंकजा दारु कंपन्यांना पाणी बंद करण्याला विरोध करत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेच्या दृष्टीने पंकजा मुंडे यांची पाणीवाली बाई नव्हे तर दारुवाली बाई अशी ओळख झालीये', अशी टीका मलिक यांनी यावेळी केली. 


दोन डीन नंबरचा वापर


यावेळी पंकजा मुंडे या कंपनीच्या संचालकपदाचे दोन क्रमांक वापरत असल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केलाय. पंकजा ३६हून अधिक कंपन्यांच्या संचालकपदी आहेत. यासाठी त्यांनी दोन डीन नंबरचा वापर केलाय. त्यांचा पहिला डीन नंबर (02241393) पंकजा चारुदत्त पालवे या नावाने आहे. यात त्यांनी वडिलांचे नाव पांडुरंग गोपीनाथ असा उल्लेख केलाय. तर दुसरा डीन नंबर  (00489330)जो पंकजा चारुदत्त पालवे या नावाने आहे. यात वडिलांच्या नावाचा मुंडे गोपीनाथ असा उल्लेख आहे. दोन डीन नंबरच्या सहाय्याने पंकजा यांनी अनेक कंपन्यांची संचालकपदी काम केलेय. 


पतीच्या दोन नावांचा वापर


तसेच पंकजा यांनी आपल्या वेबसाईटवर पतीचे नाव डॉ. अमित पालवे असे लिहिले आहे. मात्र २०१४च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी पतीचे नाव डॉ. चारुदत्त पालवे असे लिहिलेय. यावरही त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मलिक यांनी यावेळी केली.