दिनेश दुखंडे, मुंबई : आज शुक्रवार..... बॉक्स ऑफिसवर आज एक नवा सिनेमा रिलीज झालाय..... या नव्या सिनेमाचं नाव आहे 'युती के शोले़'... पाहुयात हा सिनेमा कसा आहे...... 
 
महापालिका निवडणुकीला सहा महिने राहिले असताना या शुक्रवारी हा नवा सिनेमा रिलीज झालाय.... भाजपच्या मनोगत या पाक्षिकात प्रवक्ते माधव भंडारी यांच्या लेखात उद्धव ठाकरेंची तुलना 'शोले'मधल्या आसरानीशी केलीय. आधे इधर आधे उधर, बाकी सब मेरे पेछे म्हणत उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंची अंग्रेजोंके जमाने के जेलरशी केलेली तुलना शिवसेनेच्या जिव्हारी लागली.... आणि मग मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांना गब्बर सिंगचा रोल देऊ केला. माधव भंडारींसाठी मात्र शोलेमधलं एकही कॅरेक्टर किशोरी मॅडमना सापडलं नाही, त्यामुळे माधव भंडारींना हलचलमधल्या राजपाल यादवचा रोल मिळालाय.


आता शोलेमधले आणखी बरेच डायलॉग शिल्लक आहेत...


- कितने आदमी थे 


- ये हाथ मुझे दे दो ठाकूर....


-  धन्नो भाग, आज तेरी इज्जत का सवाल है..


-  इतना सन्नाटा क्यूं है भाई....? 


हे डायलॉग भविष्यात  कोण कुणाला म्हणणार, याचीही तयारी युतीतल्या नेत्यांनी करुन ठेवावी... या सगळ्यामुळे मनोरंजन होतं आणि ज्या प्रश्नांवर महापालिका निवडणूक लढली जाते ते रस्ते, पाणी, कचरा हे प्रश्न सोईस्करपणे बाजूला पडतात... निजाम-औरंगजेब काय, वाघानं पाडलेला सिंहाचा फडशा काय आणि आता हे शोले आणि हलचल काय... हा सगळा निव्वळ टाईमपास... जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी... एवढं होऊनही दर वेळी हे दोघे शेवटी जय-वीरुसारखं 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' म्हणत एकत्र येतातच.... पण जनतेचा कौल हा शोलेमधल्या नाण्यासारखा  नसतो, तो पलटला तर सत्ता पलटेल एवढं दोघांनीही लक्षात ठेवावं.