मुंबई :  'काहीही करा मुंबईच्या महापौरपदावरील दावा सोडू नका, मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान झाला पाहिजे', अशा स्पष्ट सूचना भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्वाला दिल्याची बातमी एका न्यूज चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. शिवसेनेला सर्वाधिक ८४ तर भाजपला त्यापेक्षा फक्त दोनच कमी म्हणजे ८२ जागा मिळाल्या आहे. दोन्ही पक्षांना पालिकेत सत्तास्थापनेची समान संधी निर्माण झाली आहे. त्यातूनच सर्वात आधी अपक्षांना गळाला लावण्याची खटपट दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. भाजपला एका अपक्षाची साथ मिळाल्याचं सांगितलं जात आहे तर शिवसेनेने नाराजीतून दूर गेलेल्या दोन अपक्षांची समजूत काढण्यात यश मिळवलं आहे. तसेच आणखी एक अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी आज मातोश्रीवर जाऊन पाठिंबा जाहीर करून आला आहे.  तरीही ११४ हा बहुमताचा जादुई आकडा दोन्ही पक्षांसाठी अद्याप दूरच असून पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.


भाजपला प्रथमच मुंबईत मोठं यश मिळालं आहे. मुंबईत पक्षाचा महापौर बसू शकतो, अशी आशाही पल्लवित झाली आहे. त्यामुळेच राज्यातील नेतृत्वाला दिल्लीतून तातडीचा निरोप आला आहे. 


शिवसेना आणि भाजपमध्ये केवळ दोनच जागांचा फरक आहे. त्यामुळे संख्याबळाच्या गणिताची जुळवाजुळव करून महापौरपद भाजपकडे खेचून आणा, अशी स्पष्ट सूचना दिल्लीतील भाजप मुख्यालयातून राज्यातील नेतृत्वाला देण्यात आली आहे. दिल्लीतून यासाठी खास फोन करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले.


तसेच पुन्हा शिवसेनेशी युती करून अडीच अडीच वर्षांसाठी महापौरपद पदरात पाडून घेण्याच भाजपचा अखेरचा प्रयत्न असणार आहे.