मुंबई  :  सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलिसांना मात्र आपलेच प्रश्न मांडण्यासाठी शासनदरबारी फेऱ्या माराव्या लागतात. दररोज पडणारा कामाचा ताण, कुटुंबीयांना देण्यात येणारा वेळ, ड्युट्यांचा प्रश्न, घरासंदर्भातील गहन प्रश्न, पदोन्नती तसेच बदल्या यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि राहणीमानावर होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची संघटना निर्माण करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त नितेश राणे यांनी सोमवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र सुपूर्द केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तणावामुळे पोलिसांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. घर, काम, पदोन्नती आणि बदल्या यामुळे राज्यातील प्रत्येक पोलीस सध्या त्रस्त आहे. कुटुंब आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 


सध्या पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पोलिसांसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांनाही अशाप्रकारची संघटना निर्माण करण्यास परवानगी दिल्यास, त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर दिसून येईल, याबाबत गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती नितेश राणे यांनी या पत्राद्वारे केली आहे.


सध्या केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी संघटना निर्माण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत आहे. मात्र राज्य शासनाचे कर्मचारी असलेल्या पोलिसांना मात्र आपले प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही आधार नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता नितेश राणे पुढे सरसावले आहेत.