दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  एकीकडे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भूमीपूजन झालेल्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या स्मारकाचे काम एक वर्ष होऊनही सुरू होऊ शकलेले नाही. पंतप्रधानांच्या हस्तेच भूमीपूजन होऊनही एक वर्ष उलटले तरी इंदू मिलची जागा अजूनही सरकारच्या मालकीची झालेली नाही. तर दुसरीकडे इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 40 टक्के जागा अद्याप सीआरझेड बाधीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
काय आहे इंदू मिलचं प्रकरण...


- 10 ऑक्टोबर 2015 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमीपूजन
- भूमीपूजनाच्या आधी एनटीसीबरोबर करार
- जमीनीचा मोबदला कसा द्यायचा यावरून सुरुवातीला घोळ
- सरकारने टीडीआर विकावा आणि एनटीसीला जमीनीचे पैसे द्यावे असा निर्णय
- इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 40 टक्के जागा अद्याप सीआरझेड बाधित
- त्यामुळे केवळ 60 टक्के जागेवरचा टीडीआर सरकारला विकावा लागणार
- टीडीआर विकून एनटीसीचे पैसे देण्यासाठी सरकारला अद्याप यश नाही
- एनटीसीला मोबदला मिळाला नाही म्हणून इंदू मिलची जमीन अद्याप सरकारच्या नावावर नाही
- जोपर्यंत जमीन सरकारच्या नावावर होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू होऊ शकणार नाही
- एकीकडे भूमीपूजनाला एक वर्ष उलटूनही आंबेडकर स्मारकाचे काम सुरू होऊ शकलेले नाही
- दुसरीकडे आता पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमीपजून होत आहे
- मतांच्या राजकारणासाठी कोणतीही ठोस तयारी नसताना स्मारकांचे भूमीपूजन करून राजकारण केले जाते आहे का असा सवाल उपस्थित होत आहे
- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या आधी आंबेडेकर स्मारकाचे भूमीपूजन केले गेले
- आता मुंबईसह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचे भूमीपूजन होत आहे