मुंबई : शेतकरी दिन आता तिथीनुसार साजरा होणार आहे. शेतकरी दिन २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जात होता, २९ ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. तो वर्षानुवर्षे याच तारखेला होत आहे. मात्र शेतकरी दिनाच्या बाबतीत तिथीचा विचार करण्यात आला आहे, त्यामुळे आता शेतकरी दिन २ वर्षे २९ ऑगस्टला साजरा केल्यानंतर, तो आता तिथीनुसार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 


पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी त्यांचे नातू आणि तत्कालीन राज्य सरकारमधील कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता. 


तत्कालीन आघाडी सरकारने १६ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार २९ ऑगस्ट रोजी, शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा दिन साजराही करण्यात आला.मात्र आता  सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप - शिवसेना सरकारने शेतकरी दिन, तिथी नुसार साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 


नारळी पौर्णिमेच्या दिवशी विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म झाला होता. यंदा नारळी पौर्णिमा १७ ऑगस्ट रोजी असल्याने हा दिन १७ रोजी साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे. तिथीनुसार हा दिन साजरा करण्यात येणार असल्याने दरवर्षी नारळी पौर्णिमेला बदलत्या तारखेनुसार हा दिन साजरा केला जाईल.