सायबर गुन्ह्यांबाबत आता कुठूनही करता येणार तक्रार
महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला.
मुंबई : महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला.
महाराष्ट्रात काही मोजक्या ठिकाणी सायबर सेलची कार्यालयं याआधी होती. मात्र सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण पाहता आता प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यात सायबर सेल कार्यालय सुरु केलं जात आहे. यात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण देऊन सायबर फोर्स तयार केला जात आहे. सायबर पोलीस फोर्स स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सायबर सेल कार्यालयामुळे हद्द हा विषय संपून सायबर गुन्ह्यांबाबत आता कुठूनही तक्रार देता येणार आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तालय या दोन्ही ठिकाणी सायबर लॅब कार्यन्वित झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातले अनेक सायबर गुन्हे उघड व्हायला मदत होणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतल्या तिस-या मजल्यावर ७३० स्क्वेअर फूट जागेत सुसज्ज सायबर लॅब स्थापण्यात आली आहे. एकंदर २० जणांचं प्रशिक्षित पथक या लॅबचं काम पाहणार आहे. तर ठाणे ग्रामीण पोलीस कार्यलयालाही अशीच सुसज्ज सायबर लॅब तयार करुन देण्यात आली आहे.