मुंबई : मुंबई खड्डेमय झालेली असतानाही पालिका प्रशासन मात्र मुंबईत केवळ 35 खड्डे असल्याचा दावा करतंय. अतिरिक्त आय़ुक्त आय़ ए कुंदन यांनी हा हास्यास्पद दावा केलाय स्थायी समितीत. त्यामुळं चिडलेल्या विरोधकांसह सत्ताधा-यांनीही प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो मुंबईकर रोज असे खड्ड्यातून प्रवास करत असताना बीएमसीचे अधिकारी मात्र बहुधा हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असावेत, त्यामुळंच त्यांना रस्त्यांवरील खड्डे जाणवत नसतील. यातूनच मुंबईत केवळ 35 खड्डे असल्याची थाप चक्क स्थायी समितीतच ठोकून दिली आणि एकच गदारोळ उडाला. विरोधकांसह सत्ताधारीही मग प्रशासनावर तुटून पडले. 


आतापर्यंत सत्ताधारी प्रशासनाला पाठिशी घालत असल्याने यावेळी मात्र प्रशासनाची भंबेरी उडाली. तसंच जेजे मार्गवर आठवड्यापूर्वी खड्डयामुळं रिझवान खान या युवकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला खड्डा नव्हे तर एमटीएनएलचा चेंबर जबाबदार असल्याचा जावईशोध प्रशासनाने लावल्यानं सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर पुन्हा हल्लाबोल केला.


यावेळी विरोधकांबरोबरच सत्ताधा-यांनीही प्रशासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली. भाजपने तर मागील वेळी खड्ड्यांवरून स्थायी समितीतून सभात्यागही केला होता. निवडणुकीत शिवसेनेला बदनाम करण्यासाठी प्रशासन जाणूनबुजून खड्डे बुजवले जात नसल्याची शंका शिवसेना नेत्यांनी व्यक्त केलीय.


मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे असतानाही बिनधास्त खोटे बोलणा-या पालिका प्रशासनाच्या अधिका-यांना चाप बसवण्याची गरज आहे. केवळ 35 खड्डे असण्याचा दावा करणं म्हणजे मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.