अमित जोशी, मुंबई : मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाखांची मदत वाढवून ती 10 लाखापर्यंत देता येईल का? यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल... तसंच या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, असं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मंत्री यांनी दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोधैर्य योजनेद्वारे पीडितांना किमान रु. २ लाख ते ३ लाख पर्यंत आर्थिक मदत दिली जाते... ही तुटपुंजी असलेली मदत वाढवून देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या हुस्नबानू खलीफे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.  


यावर, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन करून व्यापक योजना लवकरात लवकर आणली जाईल यासाठी विविध विभाग तसंच विधिमंडळातल्या महिला सदस्यांची समिती नेमून चर्चा करून पीडितेला जास्तीत जास्त मदत मिळावी या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. 


2013 पासून मनोधैर्य योजना लागू झाल्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने ही मदत देणं कठीण आहे, असं सांगत बलात्कार पीडितेला आधार देण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाचं शिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. निधी अभावी मदत प्रलंबित राहणार नाही याची काळजी सरकार घेईल असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.


पीडित अशा महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, वित्तीय सहाय्य देणे, तसेच समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत इत्यादी आधारसेवा तत्परतेने उपलब्ध करुन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजनेतून मदत केली जाते.