मुंबई : आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुपोषणानं सहाशे मुलं मेली तर मरु दे, असे धक्कादायक आणि असंवेदनशील विधान आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले. पालघर - मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी इथे आदिवासींचा सरकारविरोधातला संताप पाहायला मिळाला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा कुपोषणाने मृत्युमुखी पडलेला बालक सागर वाघ यांच्यात कुटुंबियांना भेटायला आले होते. मात्र सागरच्या आईने आणि आजीने चक्क सवरा यांना दारातूनच हाकून दिले. 


पंधरा दिवसानंतर फक्त फोटो काढून घ्यायला आले आहेत का? असा संतप्त सवाल सागरची आई सिता हिने मंत्री महोदयाना विचारून अगदी दारातच त्यांचा पाणउतारा केला. अखेर मंत्री महोदयाना ताफ्यासह काढता पाय घ्यावा लागला.
 
दरम्यान, सावरांच्या धक्कादायक विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. तसेच माजी आमदार विवेक पंडित यांनीही सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.