मुंबई : मुंबईत खेळाच्या मैदानांची तशी वानवाच आणि जिथे मैदानं आहेत त्यातील काही मैदानांवरही संबंधितांचा डोळा आहे. शहरातील 22 मैदानांवर पे अँड पार्कची सुविधा करता येईल असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी मुंबई महापालिकेकडे पाठवलाय. यामुळे स्थानिक नाकरिक रोष व्यक्त करत असून मैदान बचाव समितीनेही याबाबत आवाज उठवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्किंगसाठी मुंबईतील कोणती ठिकाण वापरता येतील याचं सर्वेक्षण मुंबई वाहतूक पोलीस विभागानं केलं. त्यात पे अँड पार्कसाठी 335 जागा निवडल्या असून त्यापैकी 22 जागा मोकळ्या जागा आणि मैदान आहेत. त्यापैकी 11 जागा एल वॉर्डमधील म्हणजे कुर्ला-साकीनाका-पवई-चांदीवली या परिसरातील आहेत. यामुळे इथल्या नागरिकांमध्ये असंतोषचं वातावरण आहे.


सामाजिक कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरण समोर आलं असून, याप्रकरणी मैदान बचाव समितीनं आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिलाय. याप्रकरणी वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त मिलिंद भांबरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


असा प्रस्ताव आला असला तरी अशाप्रकारे मैदानांचा वापर पार्किंगसाठी केला जाणार नसल्याचं संबंधित मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मीडियात याबाबत बातम्या यायला लागल्यानंतर संबंधित याबाबत स्पष्टीकरण देत आहेत. अन्यथा ही मैदानही गिळंकृत केली गेली असती.