तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्र्याचे अभय, नवी मुंबई आयुक्तपदी कायम!
नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पालिकेतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेना नगरसवेकांनी जीवाचे रान उठवले. त्यासाठी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू गेल्यानंतर त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मुंबई : नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पालिकेतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेना नगरसवेकांनी जीवाचे रान उठवले. त्यासाठी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू गेल्यानंतर त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
नवी मुंबईचे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडीने अविश्वास ठराव आणला. त्याला अपक्ष नगरसेवकांसह शिवसेना नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र, सुरुवातीला तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आवाज अठवणारा भाजप ठरावाच्यावेळी विरोधात मतदान केले.
तुकाराम मुंढे हे कार्यक्षम अधिकारी असल्याचे नमूद करत त्यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. मुंढे यांना हटवण्यासाठी राष्ट्रवादीसह शिवसेनाही आग्रह होती. मुंढे यांना अभय देतानाच त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
तसेच अविश्वास ठरावाला ज्यांनी पाठिंबा दिला, त्या नगरसेवकांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आयुक्तांना पारदर्शी तसेच कार्यक्षमतेने काम करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, मुंढे यांची बदली केली गेली नाही तर आपण महापौर पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा सुधाकर सोनावणे यांनी दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांना कायम आयुक्तपदी ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सोनावणे आपला राजीनामा देणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.