COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) 'हुंदे असले तो बध डेंजर चमार' असं गाणं असलेला 'डेंजर चमार' नावाचा अल्बम पंजाबीत लोकप्रिय होतोय. 'हत्यारांपेक्षा अधिक धोकादायक आहे चांभार', आम्ही शत्रूचे शत्रू आणि मित्राचे तेवढेच मित्र आहोत', असं हे गौरव गीत आहे. 


या गाण्यातील गायिका अवघ्या १८ वर्षांची आहे. या गायिकेचं नाव गुरूकंवल भारती आहे, तिला गिन्नी माही म्हणूनही फेसबुक आणि यूट्यूबवर ओळखतात. तिला 'चांभार क्वीन'ही म्हटलं जातं. ती पंजाबमधील जालंधरची आहे. पुढची पिढी किती बिनधास्त आणि किती झटपट बदलाची अपेक्षा ठेऊन आहे, यासाठी गिन्नी माहीची ही कहाणी.


मैं तो भीमराव की बेटी हूँ


सदगुरू रवीदास आणि बाबासाहेब आंबडेकरांवर गिन्नी माहीची सर्वात जास्त गाणी आहेत. मी बाबासाहेबांची मुलगी असल्याचं ती म्हणते.जालंधर हा पंजाबमधीस सर्वात जास्त दलित लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात चामड्यावर आधारीत रोजगार करणारा मोठा वर्ग आहे.


जात विचारली आणि तयार झाला अल्बम 'डेंजर चमार'


गिन्नी माहिला एकदा एकाने जात विचारली होती, त्यातही तीने एससी असं सांगितल्यावर त्यातही काही प्रकार असेल असं विचारल्यावर तिने जोर देत 'चांभार' असं सांगितलं.


आपल्या जातीवर कोणतीही लाज वाटू देऊ नका, आपल्या जातीवर आपल्याला गर्व असल्याचं सांगा, आणि काही तरी चांगलं करून दाखवा, असं गिन्नी माही म्हणते.


चांभार क्वीन


गिन्नीचे २२ पेक्षा जास्त अल्बम आहेत, गिन्नीला फिल्म इंडस्ट्रीत गाण्यासाठी अनेक ऑफर्स आहेत, पण ती त्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनाने पाहत नाहीत. आपलेला मिळालेला हा कणखर आवाज आपण समाजाच्या उद्धारासाठी, जागृतीसाठी वापरणार असल्याचं गिन्नी माहीने म्हटलं आहे.


जात लपवली नाही गर्वाने सांगितली


सामाजिक दबावामुळे जात लपवण्याचे दिवस आता संपले आहेत, उलट जातीवर आपल्याला गर्व असल्याचं सांगून, याचा वापर आपण समाजात जागृती करण्यासाठी करणार असल्याचं १८ वर्षाची गायिका गुरकंवल भारतीने म्हटलं आहे.


बाबासाहेबांनी सांगितलंय, आधी शिका...


गिन्नी माहीने 'डेंजर चमार' नावाचा अल्बम काढला तो प्रचंड गाजला. त्याला लाखो हिट्स मिळतायत. अकरा वर्षाची असल्यापासून तिने गायनाला सुरूवात केली. सध्या ती शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणार आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा आधी 'शिका' हा संदेश ती पाळणार आहे.