यंदाही श्री गणरायाचे आगमन खड्डयातूनच
मुंबईत यंदाही श्री गणरायाचे आगमन रस्त्यांवरील खड्डयातूनच होणाराय. मुंबई महापालिकेने खड्डे भरण्यासाठी दिलेल्या तीन डेडलाईन उलटल्या आहेत. रस्त्यांची स्थिती काही बदलेली नाही.
मुंबई : मुंबईत यंदाही श्री गणरायाचे आगमन रस्त्यांवरील खड्डयातूनच होणाराय. मुंबई महापालिकेने खड्डे भरण्यासाठी दिलेल्या तीन डेडलाईन उलटल्या आहेत. रस्त्यांची स्थिती काही बदलेली नाही.
पालिका मात्र अजूनही शहरात फक्त 96च खड्डे असल्याचा दावा करतेय. त्यात आता दोन दिवसांपासून मुंबईत पुन्हा पावसाने पुनरागमन केलंय. खरतंर गेले दोन आठव़डे पावसानं घेतलेल्या विश्रांतीच्या काळात खड्डे भरता आले असते.
गेल्या अनेक दिवसांपासून बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि मुंबई उपनगरे गणेश उत्सव समन्वय समिती यांचे वतीने पालिकेकडं खड्डे भरण्यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी पालिका आणि गणेश मंडळ समित्यांमध्ये बैठकाही पार पडल्या आहेत.
पालिकेने सुरूवातीला २१ ऑगस्टपर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २६ ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली होती. तर सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत २४ तासांत खड्डे भरण्याचे आश्वासन बीएमसी प्रशासनाने दिले होते. परंतु अनेक गणेश मंडळांनी गणेश मूर्ती मंडपात नेण्यास सुरूवात केली.
अद्याप रस्त्यांवरील खड्डयांचे साम्राज्य तसंच आहे. त्यामुळं आता गणेश मूर्ती घेवून जाताना गणेश मंडळांनीच खबरदारी बाळगण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलंय. तसंच मूर्ती नेताना काही दुर्घटना घडल्यास तसंच गणेश आगमन आणि गणेश विसर्जनाला खड्ड्यांमुळं उशिर झाल्यास त्याला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचं मत गणेशोत्सव समन्वय समितीनं व्यक्त केलंय.