सात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
सात वर्षांच्या कालावधी नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर जाहीर भाषण करणार आहेत. निवडणुकीत सतत अपयश पदरी पडत असताना पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची सभा मानली जातेय.
मुंबई : सात वर्षांच्या कालावधी नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर जाहीर भाषण करणार आहेत. निवडणुकीत सतत अपयश पदरी पडत असताना पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची सभा मानली जातेय.
मनसेच्या गुढी पाडव्याच्या सभेची तयारी पूर्ण झालीय. पक्षाला या सभेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सभेसाठी पक्षाने मोठा जोर लावलाय. पण मुद्दा आहे की, मनसेची गुढी या सभेमुळे उभी ठाकणार का?
'मनसे'समोरचं खरं आव्हान
राज ठाकरे.... महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पकाळात अधिक चढ़-उतार अनुभवलेले तरुण नेते... शिवसेनेत असताना आणि नंतर तिथून फुटून निघाल्यावर राज ठाकरे स्वतःची वाट शोधत आहेत, ती आजवर... ते आजवर एका मुद्द्यावर कायम ठाम राहिलेले दिसलेले नाहीत आणि हीच त्यांच्यासाठी खरी आव्हानात्मक स्थिती आहे.
पक्ष स्थापन करताना राज ठाकरे विकासाचा नारा घेऊन आले. हा नारा मुंबई मनपा निवडणुकीत सपशेल अपयशी ठरला. फक्त ७ नगरसेवक निवडून आले.
मग मराठी-अमराठीचा मुद्दा राज ठाकरे यांनी जवळ केला. त्याने पक्षाला चांगले दिवस आले. लोकसभेत लाखो मतं, विधानसभेत १३ आमदार, नाशकात महापौर अशी यशाची अनेक बिरुदं त्यांनी कमावली. पण पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न!
मोदींचे गोडवे
राज ठाकरे त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेतात असा आरोप अनेकदा झाला तो याच सुमारास... सुरुवातीला हिंदी बोलणारे राज ठाकरे अचानक फक्त मराठी बोलू लागले. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुका येताच त्यांनी पुन्हा हिंदी बोलायला सुरुवात केली. इतकेच कमी की काय, नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हायला हवेत ही अधिकृत भूमिका राज ठाकरे यांनी सर्वप्रथम गुजरात आणि नंतर महाराष्ट्रातही मांडली. या भूमिकेचा पुरस्कार केला. गुजरातचा दौरा केला. तिथल्या विकासाचे गोडवे गायले.
इतकं कमी की काय तर मोदींसाठी मनसेने लोकसभा लढवायची नाही इतका निर्णय घेण्यापर्यंत चर्चा पोहचली. पण यावर ही ते स्थिर राहिले नाहीत. शिवाय याचा परिणाम काय ते आपण सगळे जाणून आहोत.
पक्षाचा हरवलाय सूर...
ज्या मुद्द्यांच्या आधारे राजकारण करायचे त्या बाबतची धर-सोडवृत्ती एकीकडे तर दुसरीकडे पक्षाच्या वाढीसाठी पोषक कार्यकर्त्यांची कमतरता, अशा दुहेरी आव्हानातून मनसे सध्या जात आहे.
शिवसेना-मनसे तू तू मैं मैं
पक्षाला सूर सापडत नाहीए. त्यात नेतृत्वाची जबाबदारी मोठी आहे. मनसे हा राज ठाकरे यांचा एकखांबी तंबू आहे. तिथे तेच होते जे नेतृत्वाला हवे असते. अशा एकखांबी तंबूसमोर आज शिवसेना-भाजपचे कठोर आव्हान उभे आहे. शिवसेना सत्तेत दुय्यम स्थानी आहे. शिवसैनिक यामुळे कितीही नाराज असो... आजचा शिवसेनेचा चेहरा सत्तेतील विरोधक असा आहे. त्यांच्यासाठी मनसे कायम शत्रू क्रमांक एक असेल. त्यासाठी आज मोठा पक्ष असलेल्या भाजपशी सेनेने जुळवून घेतले आहे. तर भाजप कायम आपल्या शत्रू क्रमांक एक असलेल्या शिवसेनेला चिमटे काढायला मनसेचा उपयोग होतो का? याची चाचपणी करत असतो.
शिवाजी पार्कात सभा
शिवाजी पार्कात राजकीय सभा घेणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. असे असतानाही मनसेला दर गुढी पाडव्याला सभा करायची परवानगी मिळते यातच सारे काही आले. सत्ताधारी सोबत असल्याशिवाय हे घडू शकते का? या स्थितीत नवी उभारी द्यायला राज ठाकरे मैदानात उतरत आहेत. त्या मैदानात जिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकारणाचे अनेक चढ-उतार पाहिले. तेव्हा ही सभा पक्षासाठी निर्णायक असेल. इथून पक्षाचा परतीचा मार्ग धूसर आहे.
'मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतो' अशी भावनिक साद कधी एकदा राज ठाकरे यांनी याच शिवाजी पार्कातून घातली होती. आता राज ठाकरे पुनः त्याच शिवाजी पार्कात येत आहेत. प्रश्न इतकाच उरतो की आता राज ठाकरेंकडे अर्पण करायला काय उरले आहे.