मुंबई : विखे पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप यांची मिलिभगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बाळासाहेब विखे पाटलांनी युती शासनाच्या काळात मंत्री असताना अमित शाह यांना एका बँक घोटाळ्यातून वाचवलं होतं. त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय.


 विरोधी पक्षनेतेपद सांभाळण्यात ते अपयशी ठरले असं सांगत, विधानसभेत ते जो प्रश्न विचारतात, बरोबर त्याचच उत्तर दुस-या दिवशी मुख्यमंत्री देत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. शेवटच्या काळात बाळासाहेब विखे पाटील राधाकृष्ण यांच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल निराश असल्याचं अशोक विखे पाटील म्हणाले. 


बाळासाहेब विखे पाटील हयात असताना अडीच वर्षांपूर्वी त्यांनी या संस्थेची जबाबदारी आपल्याकडे सोपवली होती. त्यासाठी संस्थेच्या घटनेतही बदल करण्यात आला होता. त्या बदलाबाबत धर्मादाय आयुक्तांकडे निर्णय प्रलंबित असतानाच सत्तेचा दुरुपयोग करुन, प्रवरा शैक्षणिक संस्थेचं संचालकपद बळकावल्याचा आरोप अशोक विखे पाटलांनी केला आहे.