मुंबई उपनगरासह राज्यात पाऊस
मुंबई उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई : मुंबईतही आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. मात्र, मुंबई उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.
मुंबई उपनगरातील विरार, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे येथे अवकाळी पाऊस पडत आहे. गेले दोन दिवस मुंबईच्या तापमानाचा पारा चढला होता. त्यामुळे घामाच्या धाराने मुंबईकर भिजून निघाला. आज पाऊस पडत असल्याने अनेक चाकरमान्यांना छत्रीचा आसरा घ्यावा लागला.
वसई-विरारमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. काही दिवसांपासून उकाडा अनुभवणाऱ्या स्थानिकांना, या अवचित आलेल्या पावसानं गारव्याचा शिडकावा केला.
पालघर तालुक्यातल्या किराट इथं सोसाट्याच्या वाऱ्याने घरांची छपरं उडाल्याची घटना घडलीय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तीन घराचं नुकसान झालंय. याशिवाय एका घराची भींत कोसळून एक जण जखमी झालाय. त्याच्यावर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वसई भागातही पाऊस बरसला.
लातूर, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये पाऊस पडत असल्याने पिंकांचे मोठे नुकसान झालेय. लातूरमध्ये शेततळी भरल्याने पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झालेय.