`स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा`
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव आहे असं म्हणत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.
मुंबई : महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव आहे असं म्हणत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.
हुतात्मा चौकात यंदा सजावट का नाही?
दरवर्षी, १ मे रोजी हुतात्मा चौकात सजावट केली जाते. परंतु, यंदा मात्र १ मे रोजी हुतात्मा स्मारकाला सजावट नव्हती. सेना भाजप महापालिका आणि राज्यात सत्तेत आहेत. हुतात्मा स्मारकाच्या सजावटीवरून टोलवाटोलवी करणाऱ्या भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रातील लोकांची माफी मागायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
'मुख्यमंत्र्यांनी केलं होतं स्वतंत्र विदर्भासाठी मतदान'
स्वतंत्र विदर्भासाठी २०१३ साली मतदान घेण्यात आलं होतं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसही तिथं उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भासाठी मतदान करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी का?, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केलीय.
'महाराष्ट्रापासून मुंबई विलग करण्याचा हा डाव'
वेगळ्या विदर्भासाठी श्रीहरी अणेंना संघ-भाजपनेच पुढे केलंय. स्वतंत्र विदर्भ, मराठवाडा करत करत हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रीय पक्षांना कुठल्याही माणसांबद्दल आणि राज्यांबद्दल आपुलकी नसते... राज्यांबद्दल काहीही कळवळा नसतो, ते राज्य तोडायलाच बसलेत, असंही त्यांनी म्हटलंय.
शिवसेनेच्या ढोंगीपणावर टीका
सेनेविषयी बोलताना, 'शिवसेनेविषयी बोलायलाच नको. सत्ता सोडवत नाहीये आणि सत्तेत राहून टीका करत बसायची... आपण सत्तेत आहोत की बाहेर हेच शिवसेनेलाच नेमकं ठाऊक नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
शिवसेना सत्तेत पण राहते आणि आंदोलनं पण करतेय, याचा अर्थ काय? असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. शिवसेना सत्तेत राहून विरोध करण्याचं ढोंग करतात, सत्तेतून बाहेर का पडत नाहीत? असा सवाल त्यांनी यावेळी केलाय.