मुंबई : शहरात या पुढे आपल्या विभागात होणाऱ्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांची मुंबईकरांना मोबईल किंवा संगणकाच्या एका क्लिकवर तक्रार नोंदवता येणार आहे. मुंबई महापालिकेनं सुरु केलेल्या एका अॅपमुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही जागरुक मुंबईकर आहात आणि आपल्या अवतीभवती घडणा-या घटनांवर तुमचं बारीक लक्ष असतं, तर मुंबई महापालिकेचा एक नवा अॅप तुमच्या नक्की उपयोगाचा आहे. removal of encrochment deparment  अॅपवर नागरिकांना अनधिकृत बांधकामं तसंच अतिक्रमणांबाबत तक्रार करता येणार आहे. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर सुरु झाली आहे. पुढच्या दोन दिवसांत नागरिकांना त्यांच्या अॅड्रॉइड मोबाईल फोनवर मिळेल. मुंबईत रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेनं पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टिम तयार केली होती. 



या प्रणालीचा सकारात्मक परिणामही आढळून आला होता.  तशाच पद्धतीनं आता अनधिकृत बांधकामांचे किंवा अतिक्रमणांचे फोटो तक्रारदारानं तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर किंवा अॅपवर टाकायचे आहेत. २०१३ सालापर्यंत एकूण ५६ हजार अनधिकृत इमारती आणि बांधकामांची नोंद करण्यात आली होती. त्यात कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांची संख्या ४५ हजार आहे, तर कारवाई न झालेल्या बांधकामांची संख्या सुमारे १५ हजार इतकी आहे. 
 
तक्रार प्राप्त होताच महापालिका अधिकारी त्याची नोंद घेतील. छाननी केल्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली जाईल. तक्रारदाराला संबंधित कारवाईचा तपशील वेळोवेळी त्याच्या मोबईल फोनवर एसएमएसच्या माध्यमातून कळविला जाणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. पुढच्या काळात ही प्रणाली स्थानिक पोलीस ठाण्याशी जोडण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.