मुंबईतलं सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन होणार इतिहासजमा
मुंबईतील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक आता इतिहासजमा होणार आहे.
मुंबई : मुंबईतील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक आता इतिहासजमा होणार आहे. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला असा पाचवा-सहावा मार्ग बनवणार आहे, त्यासाठी रेल्वेला अनेक बदल करावे लागणार असून ऐतिहासिक वास्तूंवरच हातोडा चालवावा लागेल. हे मार्ग बनवताना हार्बर मार्गावरील ब्रिटिशकालिन सॅण्डहर्स्ट रोड स्थानकही जमीनदोस्त केले जाणार आहे.
नवे सॅण्डहर्स्ट रोड स्थानक पी. डिमेलो रोडच्या दिशेला उभारले जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या बदलामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाला रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठीचा खर्च, आरेखन इत्यादीवर अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने दादर स्थानकात पश्चिमेला दोन नवीन प्लॅटफॉर्म, सायन, करी रोड, चिंचपोकळीसह भायखळा स्थानकातील रचनेतही बदल केले जातील.
हार्बरवर कुर्ल्यापासून सीएसटीपर्यंतही बदल होतील. हार्बर मार्ग कुर्ला, डॉकयार्ड रोड येथून पी.डिमेलो रोडमार्गे वळवला जाणार आहे. मेन लाइनवरील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक मात्र उपलब्ध केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.