कविता शर्मा (मुंबई) : मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर 1888 सालचं एक तळघर सापडलंय. इंग्रजांच्या काळातल्या या तळघरात अनेक गुपितं दडली आहेत. या तळघरात जाण्यासाठी सीएसटीच्या कॅश ऑफीसमधून एक गुप्तवाट आहे. ही वाट आरबीआय ऑफीसपर्यंत जाते असंही सांगितलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1888 मध्ये इंग्रज आर्कीटेक्ट फेडरीक विल्यम स्टिव्हन्सने तेव्हाचं व्हीक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आजचं मुंबई सीएसटी स्टेशनचं डिझाईन केलं. आज हे भव्य स्टेशन युनेस्कोच्या हेरिटेज लीस्टमध्ये आहे. मात्र या स्टेशनवर आज एक जुनं रहस्य उघड झालं. 


या रेल्वे स्टेशनखाली एक गुप्त तळघर सापडलंय. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या काळातलं हे तळघर आहे. या तळघरात जाण्याचा रस्ता इमारतीच्या कॅशियर ऑफीसच्या बरोबर पाठीमागे आहे. त्याच्या दरवाजावर ब्रिटीशांची मोहोर उमटली आहे. तळघरात जाण्यासाठी 1000 किलो वजनाचा दरवाजा आहे. 


खुप प्रयत्नाने दरवाजा उघडल्यावर तळघरात जायचा भुयारी मार्ग दिसतो. झी मीडियाच्या प्रतिनिधी कविता शर्मा या तळघरात गेली. तळघरात जाण्यासाठी या छोट्याशा मार्गावर 34 पाय-या आहेत. खाली उतरल्यावर खाली दोन मोठ्या खोल्या दिसतात. खोल्यांमध्ये काही रॅक आहेत. त्यानंतर एक मोठा दरवाजा आणि त्याच्या आत काही मोठ्या पेट्या आणि तिजो-या आहेत. इथे कधी काळी रेल्वेचे पैसे मोजले जायचे. 


रेल्वेचे पैसे या तळघरात मोजल्यावर थेट आरबीआयमध्ये पाठवले जायचे असंही मानलं जातं. या तळघरात येणारा छोटासा भुयारी मार्ग पुढे आरबीआयपर्यंत जातो असंही सांगितलं जातं. पैशांच्या पेट्या एका लिफ्टच्या माध्यमातून या तळघरापर्यंत यायच्या


तळघराच्या आत जाताना तुम्ही एखाद्या विहीरीत जात आहात असा भास होतो. मात्र इथे आत तळघरात श्वासाचा अजिबात त्रास होत नाही. ब्रिटीशांनी इथे वायूविजनाची चांगली सोय केलीय. खोल्यांच्या आत भिंतींना तीन शाफ्ट आहेत. त्यामुळे वायूविजन होतं. 


या तळघराला पाहिलं असता आपण टाईममशिनच्या माध्यमातून 1888 सालात पोहोचल्याचा भास होतो. आज हे तळघर रिकामं आहे. पण एकेकाळी हा रेल्वेचा जणू खजिनाच होता. इथे रेल्वे आपली मिळकत सुरक्षितपणे ठेवायची.