मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन विधिमंडळात शुक्रवारी झालेल्या प्रचंड गोंधळानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या विभाजनाला  भाजप मित्र शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा देऊन भाजपला विरोध केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना कायम अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभी राहिली असून लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत आपली भूमिका पुन्हा मांडणार असल्याचं शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी म्हटले. तर काँग्रेसनंही एकसंध महाराष्ट्रासाठी शिवसेनेसोबत असल्याचं म्हटले आहे.


दरम्यान, स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा आणि शुक्रवारी विधीमंडळात त्यावरुन झालेल्या गदारोळानंतरही, भाजप स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर ठाम आहे. योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्र राज्याचं विभाजन करणार असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेनेत पुन्हा दुफळी उडणार हे निश्चित झालेय.


शिवसेनेचा विरोध असला तरी महाराष्ट्राचं विभाजन करणारच, असा दावा रावसाहेब दानवेंनी केला आहे. वेगळ्या विदर्भाला भाजपाचा पाठींबा आहे. छोटं राज्य प्रशासनाच्या दृष्टीनेही फायदेशीर असल्याचं दानवे म्हणाले. त्याचवेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून विभाजन करण्याला भाजपचा विरोध असल्याचाही त्यांनी खुलासा केला.