मुंबई : एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून दिल्या जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २६ वर्षांनी परत मिळाल्याचा अनुभव आलाय मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नगरसेविका शुभा राऊळ यांना.


मुंबईतल्या पोद्दार कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या बस स्टॉपवर एका मारुती कारमधून आलेल्या दोघांनी त्यांची दीड तोळा वजनाची सोन्याची चेन खेचली होती. त्यानंतर बरेच हेलपाटे मारल्यानंतर काही फायदा होत नसल्याचं पाहून चेन मिळण्याची आशा त्यांनी सोडून दिली.


अचानक पोद्दार कॉलेजमध्ये गेले असता विक्रोळी कोर्टाचे पत्र त्यांच्या हाती पडलं. या पत्रात त्यांची हरवलेली चेन घेऊन जाण्याबाबतचा शेवटचा संदेश होता. शिवाय चेन घेऊन न गेल्यास तिचा लिलाव करणार असल्याचंही त्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.


अखेर विक्रोळी कोर्टात जाऊन शुभा राऊळ यांनी आपली चेन ताब्यात घेतली. केवळ पत्ता बदलल्यामुळं ही चेन मॅजिस्ट्रेटकडे पडून होती. अखेर ही चेन शुभा राऊळ यांना परत मिळालीय ती २६ वर्षांनी.