युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस - उद्धव ठाकरे यांची `फोन पे चर्चा`
महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. रात्री उशिरा दोघांमध्ये याबाबतची चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय.
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. रात्री उशिरा दोघांमध्ये याबाबतची चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय.
भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र ठरवलेली डेडलाईन आज संपतेय. गेल्या आठवड्यात भाजप सेनेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी दोन्ही पक्षांनी चर्चा जास्त ताणली जाऊ नये, शेवटच्या दिवसापर्यंत वेळकाढू पणा होऊ नये यासाठी 21 जानेवारी ही डेडलाईन ठरवली होती.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चा ताणली जाऊन उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांची जास्त धांदल उडाली होतीच, पण त्याहीपेक्षा दोन्ही पक्षांमध्ये कटुता चांगलीच टोकाला गेली होती. उमेदवारी अर्ज भरायला आता जेमतेम आठवडा उरलाय. 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे.
मात्र आज भाजप सेनेची डेडलाईन संपत असतांना साधी यादी एकमेकांना देण्याची प्रक्रिया सुद्धा झालेली नाही. त्यामुळे आज काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.