सत्ताधारी शिवसेना-भाजपचे नळावरचं भांडण
सत्ताधारी शिवसेना-भाजप नळावरची भांडणं करताना दिसत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.
दिनेश दुखंडे, मुंबई : महाराष्ट्रातला भीषण दुष्काळ. शेतक-यांच्या आत्महत्या...पाणी टंचाई..वाढती महागाई...हे प्रश्न जणू निकालातच निघालेत...त्यामुळे आता काही करण्यासाठी शिल्लक न उरल्यानं सत्ताधारी शिवसेना-भाजप नळावरची भांडणं करताना दिसत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.
कार्यक्रम कोण करणार?
भांडणाचा ताजा विषय आहे, महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याचा. १ मेला मुंबई विमानतळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी कार्यक्रम कोण करणार यावरुन सुंदोपसुंदी सुरु आहे. शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐकमेकांसमोर उभे ठाकलेत...छत्रपतींचे गडकिल्ले आणि महाराष्ट्राची महती सांगणारा देखावा तसंच विद्युत रोषणाई भाजप करणार आहे. तर शिवसेनेनं संयुक्त महाराष्ट्राचा देखावा उभारुन भाजपला डिवचण्याची खेळी केलीय.
भाजपचा कार्यक्रम आधी
शिवसेनेचा कार्यक्रम १ मेला आहे. तर महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे ३० एप्रिलाला संध्याकाळी भाजप आपला कार्यक्रम करणार आहे. आता हे कार्यक्रम वेगवेगळ्या दिवशी असतील तर वादाचा मुद्दा येतोच कुठे असा उपस्थित होऊ शकतो. पण ग्यानबाची मेख इथेच आहे. भाजपचा कार्यक्रम ३० एप्रिलला असला तरी त्याची सजावट पुढचे दोन दिवस तशीच राहील असं पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलंय.
शह देण्याचा भाजपचा प्रयत्न
शिवसेनेला शह देण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. तर शिवसेनेनंही आपला कार्यक्रम नियोजित वेळेनुसारच होईल असा निर्धार केलाय. आधीच अनेक समस्यांनी पिचून गेलेल्या जनतेला या वादात बिल्कूल रस नाहीये...कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला कंटाळून जनतेनं मोठ्या अपेक्षेनं शिवसेना भाजपला चांगला कारभार करण्याच्या विश्वासानं कौल दिला... अनेक मुद्यांवर वाद घालून हे दोन्ही सत्ताधारी पक्ष मराठी माणसाच्या भावनिक गुंतवणुकीचा आणि त्यांच्या प्रादेशिक अस्मितेचा अपमानच करीत आहेत, हेच दिसून येत आहे.