नवी मुंबई : नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी यासाठी  सर्वच पक्षांनी पुन्हा आघाडी उघडली आहे. नवी मुंबईच्या महापौरांसह शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजतंय. यात शिवसेनेचे नेते आघाडीवर होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा मुंढे यांच्या बदलीचे वारे वाहू लागलेत. यासाठी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्राची भेट घेतल्याचं समजतंय. मात्र तुकाराम मुंढे यांच्या संदर्भात शिवसेनेचा कोणताही नेता बोलायला तयार नाही.


तुकाराम मुंढे यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यापासूनच अनेक नेत्यांच्या तसेच नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण मुंढे यांनी स्वच्छ आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याची सुरुवात केली होती. मात्र अनेक नगरसेवकांची प्रकरणं बाहेर आल्यानं सर्व पक्षांनी एकजूट करून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आणि तो मंजूर शासनाकडे पाठवला.


एव्हढंच नाही तर खुद्द महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन लवकरात लवकर मुंढे यांची बदली करण्याची मागणी केली होती.


तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आमचा तीव्र आक्षेप आहे. कारण ते नगरसेवकांना कधीच विश्वासात घेऊन  काम करत नाहीत. परस्पर निर्णय घेतात... त्यामुळेच सर्व पक्षांनी मिळून अविश्वास ठराव मंजूर केला, असं महापौर सुधाकर सोनावणे यांनी म्हटलंय.  


नुकतेच बदली संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटीबाबत विचारले असता सुधाकर सोनावणे म्हणतात की मी कधीच शिवसेनेच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो नाही. महापौर या नात्यानं मी त्यांना भेटून महापालिकेच्या सभागृहात घेतलेला निर्णय कळवला होता.. तर शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत न बोलणं पसंत केलंय. 


तुकाराम मुंढे यांनी आत्तापर्यंत अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे. मात्र, आता मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.