टोलवसुली पुन्हा सुरु केल्यास विमानतळ बंद पाडू - शिवसेना
मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्कींगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात शिवसेनेनं आज तीव्र आंदोलन केलं.
मुंबई : मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्कींगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात शिवसेनेनं आज तीव्र आंदोलन केलं.
गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांकडून टोल वसूल केला जातो. तो आता १३० रुपयांपर्यंत पोचलाय. त्यातून महिन्याला सुमारे ३५ ते ४० लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.
ही टोलवसुली अनधिकृत असल्याचा सार्वत्रिक आरोप आहे. तसेच नागरिकांमध्येही या टोलवसुलीबाबत प्रचंड रोष आणि मनस्ताप आहे. मनसेनं टोल वसुलीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलीय.
आज आंदोलन करून शिवसेनेनं टोलवसुली बंद केल्याचा दावा केलाय. तसेच पुन्हा टोलवसुली सुरु झाल्यास विमानतळ बंद पाडू, असा धमकी वजा इशारा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या जीव्हीके कंपनीला दिलाय. तसेच विमानतळ नूतनीकरण करताना हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा मूळ जागी बसविण्यात यावा, अशी मागणीही शिवसनेने केलीय.