दिनेश दुखंडे, मुंबई : एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.


व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घात झाला... महाराज घात झाला... एका व्यंगचित्रानं घात केला... शिवसेनेच्या गोटात एका व्यंगचित्रामुळे वादळ उठलंय... मुळात शिवसेनेचा जन्मच व्यंगचित्रातून झाला... बाळासाहेबांच्या मार्मिकमधल्या कुंचल्याचे फटके मराठी माणसाच्या वर्मी बसले आणि पाहता पाहता त्यातून संघटना निर्माण झाली.... बाळासाहेब फर्डे वक्ते, कुशल संघटक आणि उत्तम राजकारणी होतेच, पण त्याहीपेक्षा ते जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार होते.


बाळासाहेबांनी रेखाटलेलं एक व्यंगचित्र

व्यंगचित्रामुळेच सेनेला उतरती कळा?


त्यांच्या व्यंगचित्रांनी सामाजिक, राजकीय उठाव घडवून आणले. पण त्यांची व्यंगचित्र कधी वादग्रस्त ठरली नाहीत... किंवा त्या काळी समाजानं तितक्याच खुलेपणानं स्वीकारली. पण आज याच व्यंगचित्रामुळे शिवसेनेला उतरती कळा लागणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्याला कारण ठरलंय 'दैनिक सामना'मध्ये श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र....


या व्यंगचित्राविरोधात पक्षातलाच मराठा समाज पेटून उठला. गावोगावी पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं. 48 तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सामनामधून श्रीनिवास प्रभूदेसाईंनी दिलगिरी व्यक्त केली... पण त्याला थोडा उशीरच झाला. वेळीच पक्षनेतृत्वानं हे व्यंगचित्र गांभीर्यानं घेत पावलं उचलली असती तर कदाचित इतकी झळ बसली नसती.


आ बैल मुझे मार?


खरं तर राज्यातल्या भाजप प्रणित सरकारला लक्ष्य करत मराठा मोर्चे सुरू झाले. शिवसेनेबद्दल कुठेच रोष नव्हता. किंबहुना राजकीयदृष्ट्या थोडा फायदाच शिवसेनेला झाला असता. पण एका व्यंगचित्रामुळे अचानक ट्विस्ट आला आणि शिवसेना टार्गेट झाली... आता रडारवर आहेत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत...


शिवसेना ठाम भूमिका घेणार?


बाळासाहेबांनी जाती-धर्माचं राजकारण कधीच केलं नाही. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच असावं, ही त्यांची ठाम भूमिका होती. शिवसेनेच्या या परिस्थितीत राहून राहून एक प्रश्न पुढे येतो... तो म्हणजे बाळासाहेब आज असते तर त्यांनी काय केलं असतं? राजकारणी म्हणून भूमिका निभावली असती की व्यंगचित्रकलेशी निष्ठा दाखवली असती? अर्थात या प्रश्नांची उत्तरं आज मिळणं शक्य नाही.... पण आजचं शिवसेनेचं नेतृत्व आता या परिस्थितीत काय निर्णय घेतं आणि डॅमेज कंट्रोल कसं करतं, यावर बरंच काही अवलंबून आहे.


पण ज्या व्यंगचित्रानं शिवसेनेला घडवलं, तेच व्यंगचित्र शिवसेनेचं बिघडवूही शकतं, हे या निमित्तानं दिसलं.... एक चित्र हे हजार शब्दांइतकं बोलकं असतं असं म्हणतात.... तीच ताकद आज पुन्हा एकदा दिसली.