मुंबई : शिवसेना भाजप युतीचं चर्चेचं गाडं अडलं असतानाच शिवसेनेनं सोमवारी स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यात मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पण गर्जेल तो खरंच पडेल काय? हा पाहावं लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधत वचननामा प्रसिद्ध केला. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून डब्बेवाल्यांपर्यंत विविध घटकांना खुष करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला आहे. बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार नसल्याची घोषणाही यात करण्यात आली आहे.


घोषणा


500 चौरस फुटाच्या घरांना कर माफ,700 फुटाला सवलत
गणवेशातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट प्रवास
पालिका शाळेत शिकणा-यांना नोकरीत प्राधान्य
मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करणार 
महिलांसाठी स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकीन पुरवणार 
डबेवाल्यांसाठी डबेवाला भवन उभारणार 
मुंबईत जेनेरिक औषधांची केंद्र उभारणार 
मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना 
आरेमधील हरित पट्टा कायम ठेवणार 
थेट शेतमाल विक्रीसाठी मुंबईत केंद्र उभारणार... अशा घोषणा शिवसेनेनं वचननाम्यात केल्यात.



मात्र नवा वचननामा प्रकाशित करणा-या उद्धव ठाकरेंना 2012 मध्ये दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याची टीका करण्यात येतेय.


2017- मुंबईकरांना 24 तास पाणीपुरवठा 
2012- गारगाई-पिंजाळ पाणी प्रकल्प उभारणार
सद्यस्थिती- (हा प्रकल्प अजूनही अपूर्ण)


2017- शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट प्रवास
2012- एसी बसेस वाढवण्याचं वचन
सद्यस्थिती- (एसी बसेस वाढल्या नाहीत, कमी झाल्या)


2017- आरेमधला हरितपट्टा कायम राहणार
2012- धूळमुक्त मुंबईचं आश्वासन


2017- मुंबईत चार तरणतलाव बांधणार
2012- महापालिकेची क्रिकेट अकादमी सुरू करणार
सद्यस्थिती- (ही अकादमी अजून सुरू झाली नाही)


2017- जेनेरिक औषधांची केंद्रं उभारणार
2012- मलःनिस्सारण प्रकल्प उभारणार



शिवसेनेनं 2012 चा वचननामा पाहिला तर त्यातल्या अनेक गोष्टी सुरूही झाल्या नाहीत असं त्यांच्या लक्षात येईल. 


कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्प अजून कागदावरच
राणीच्या बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय नाहीच
पवई उद्यान परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालं नाही
हॉकर्स ग्राऊंड अजून विकसित नाही
मुंबईरत्न, मुंबई भूषण पुरस्कार अजून सुरू झाले नाहीत
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची बरीचशी कामे अद्याप अपूर्ण आहेत.


पब्लिक मेमरी शॉर्ट असते, असा बहुधा शिवसेनेचा समज असावा. पण पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासनं मुंबईकर अजून विसरलेले नाहीत. त्यामुळं शिवसेना जे बोलते, ते खरंच करून दाखवणार का, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.