देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपा आणि मित्र पक्षांतील राजकारणाची आणि श्रेयवादाची झलक आज पहायला मिळाली. स्मारकासाठी राज्यभरातील जल आणि मातीचे कलश मुंबईत आणण्यात आले. या कलशांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मात्र, या कार्यक्रमातून दूर ठेवण्यात आलेल्या शिवसेनेनं आता मोर्चेबांधणी सुरू केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत होऊ घातलेल्या शिवस्मारक भूमीपूजनाच्या निमित्तानं सत्ताधारी पक्षांमध्येच राजकीय आखाडा रंगलाय. राज्यभरातून जलकलश आणि मातीकलश मुंबईत आणण्यात आले. हा कार्यक्रमा नावाला राज्य सरकारचा असला तरी त्यात संपूर्णपणे भाजपाचे वर्चस्व दिसले. चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्यासह भाजपाचे मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चेंबूर येथील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ या कलशांचे स्वागत केले. 


शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यावेळी हजर होते. मात्र त्यानंतर या कलशांची गेटवे ऑफ इंडियापर्यंत खुल्या जीपमधून रॅली काढण्यात आली. मेटेंना या ठिकाणी डावलल्यानं त्यांनी काढता पाय घेतला. 
 
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही या कार्यक्रमामध्ये डावलण्यात आलं. त्यामुळे आधीच दुखावलेल्या शिवसेनेच्या संतापात भर पडली नाही, तरच नवल... त्यामुळेच  उद्धव ठाकरेंनी तातडीनं पक्षाचे सर्व मंत्री, मुंबईतले आमदार आणि विभागप्रमुखांची बैठक बोलवली. या बैठकीत बीकेसीमध्ये होणाऱ्या मेळाव्यात शक्ती प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.


गुरुवारी राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमधील संघर्ष आणि घोषणायुद्ध पहायला मिळालं. रावते-प्रभूंच्या साक्षीनं झालेला हाच खेळ पुन्हा बीकेसीमध्ये मोदी-उद्धव यांच्यासमोर होतो का? याचीच आता उत्सुकता आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचे भूमीपूजन होत आहे. त्यामुळे मतांसाठी आता मित्र पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईच्या सुरुवातीला भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. आता प्रत्यक्ष कार्यक्रमात या लढाईचा निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता आहे.