दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने शिवसेनेत अस्वस्थता आहे. शिवसेनेनं या विषयावर मौन बाळगणंच उचित मानलं असलं तरी, पक्षनेतृत्वाचं सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या अचानक झालेल्या अहमदाबादवारीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दरबारी नारायण राणे उपस्थित राहिले, त्यामुळं महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे.


फडणवीस यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सध्या शिवसेना-भाजपतला तणाव हळूहळू निवळत असल्यानं फडणवीस राणेंना भाजपात घेण्याचा धोका पत्करणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंना वाटतोय. शिवसेना महायुतीत असताना उद्धव यांनी राणे यांच्या प्रवेशाबाबत भाजपकडून तशी अपेक्षाही व्यक्त केली होती.


शिवसेना भाजप मध्ये सामंजस्य करार आहे की ज्यांनी भाजपला त्रास दिला त्यांना शिवसेना प्रवेश देणार नाही. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना भाजप प्रवेश देणार नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं.


राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच काळानं शिवसेनेला कोकणातल्या राजकारणात सूर गवसलाय. पण राणे भाजपात गेले तर ते पुन्हा कोकणात भक्क्मपणे पाय रोवण्यासाठी प्रयत्न करतील. गेले अनेक वर्षे संघर्ष केलेल्या शिवसैनिकांसाठी ते डोकेदुखी ठरेल.


सध्या राणे सिंधुदुर्गात नव्यानं पाय रोवताहेत. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवले, तर जिल्हा परिषदेतही काँग्रेसची एक हाती सत्ता आणली. विरोधी पक्षात असतानाही राणे सिंधुदुर्गात फॉर्मात येत आहेत आणि जर त्यांना भाजपच्या सत्तेची साथ मिळाली चित्रच वेगळं असेल.


भाजपलाही राणेंच्या ताकदीच्या मदतीन कोकणच्या राजकारणात प्रवेश करता येईल. त्यामुळे सध्या शिवसेनेतून राणेंच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडींवर 'नो रिऍक्शन' एवढीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.