मुंबई : मुंबई : नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या रणसंग्रामात शिवसेनेनं सर्वात जास्त जागा मिळवत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्यात. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे, हिंदूत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेनं मुस्लिमबहुल वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बेहहरामपाड्यात'ही भगवा फडकावलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्ड क्रमांक 96 म्हणजेच बेहरामपाड्यात शिवसेनेचे मोहम्मद खान यांनी दणदणीत विजय मिळवलाय. एमआयएम आणि भाजपच्या उमेदवारांना पाणी पाजत खान यांनी हा विजय मिळवला.


1992 ची दंगल आणि बेहरामपाडा...


ज्या मुंबईकरांना 1992 च्या जातीय दंगलीचे क्षण आजही आठवत असतील त्यांच्यासाठी सेनेचा हा विजय म्हणजे मोठा धक्काच ठरू शकतो. कारण, या दंगलीनंतर शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये बेहरामपाडा टार्गेट ठरला होता. हा भाग म्हणजे दहशतवादी कृत्यांचा अड्डा असल्याचं 'सामना'मध्ये म्हटलं गेलं होतं. 


आज जवळपास 24 वर्षानंतर याच बेहरामपाड्यात शिवसेना निवडून आलीय, ती कशी... याचं विश्लेषण करायचं झालं तर या भागात आजघडीला असलेल्या अनेक झोपडपट्ट्या कारणीभूत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.


बेहरामपाड्यातील झोपडपट्टी...


आज या भागात जवळपास 70 हजारांहून अधिक झोपड्या आहेत... काही तर बेकायदेशीरपणे बांधलेल्या अनेक मजल्यांच्या इमारती आहेत. परंतु, रहिवाशांच्यादृष्टीनं या झोपड्या तितक्याच असुरक्षितही आहेत. गेल्या वर्षी याच भागात लागलेल्या आगीत सहा मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. परंतु, अरुंद गल्लीबोळांमुळे अग्निशमन दलाला मदतीसाठी पोहचता आलं नव्हतं. 


मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी या झोपड्या तोडण्याचे आदेशही दिले होते. परंतु, रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही असं म्हणत शिवसेनेनं उघडपणे याविरुद्ध आंदोलन छेडलं... आणि हीच राजकीय खेळी सेनेच्या पथ्यावर पडली, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.