मुंबई : सध्या मुंबईसह अनेक मोठ्या शहरांतील बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकांची अडचण वाढली आहे. दूध, भाजी घेण्यासाठी अनेकांकडे पैसे नाही. त्यामुळे किरकोळ रोखीचा व्यवहार ठप्प आहे. पुन्हा चलन तुटवडा का निर्माण झाल्याय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आरबीआयकडून नोटांचा पुरवठा कमी झाल्याने एटीएममध्ये खडखडाट दिसून येत आहे. तसेच आज गुड फ्रायडे आणि रविवारी सुट्टी असल्याने आठवड्याच्या शेवटी एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झालाय.


रिझर्व्ह बँकेकडून मागणीच्या तुलनेत केवळ २५ टक्के चलनाचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्ये रोख रकमेची टंचाई जाणवणार आहे. राज्यातील महानगरांमधील एटीएममध्ये आधीच रोख रकमेची टंचाई आहे. त्यात आता शुक्रवार आणि रविवारच्या सुटीने आणखी भर पडणार आहे.


आरबीआयकडून अनेक बँकांना मागणीच्या प्रमाणात चलन पुरविले जात नाही. त्यामुळे खासगी बॅंकासह सरकारी बॅंकाच्या एटीएमध्ये खडखडाट दिसून येत आहे. एटीएमच्या तुलनेत रोख रकमेची उपलब्धता अतिशय कमी आहे. त्यामुळे एटीएममध्ये रोख रकमेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. 


नोटाबंदीनंतर चलन टंचाई आटोक्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा रोख रकमेच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोकड पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे रोकड टंचाई समस्या निर्माण झालेय. दरम्यान, एप्रिलच्या अखेरपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल, अशी शक्यता आहे.