मुंबई : महाधिवक्ते श्रीहरी अणेंनी आता विदर्भापाठोपाठ स्वतंत्र मराठवाड्यासाठी वकिली सुरू केलीय. त्यावरून संतापलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी विधिमंडळात जोरदार गोंधळ घातला. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अणेंचा राजीनामा घेतील अशी शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात श्रीहरी अणेंनी स्वतंत्र विदर्भाची तळी उचलून धरली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्यांनी स्वतंत्र मराठवाड्याची वेगळी चूल मांडलीय. राज्याच्या महाधिवक्त्यांनीच अशी महाराष्ट्र तोडण्याची भाषा केल्यानं सर्वपक्षीय आमदार संतापलेत. अणेंच्या राजीनाम्यासाठी त्यांनी विधिमंडळाचं कामकाज रोखून धरलं. सत्ताधारी शिवसेनेनं तर मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकण्याचा टोकाचा इशारा दिलाय.


अणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं सरकारचीही कोंडी झालीय. त्यांच्या वक्तव्याशी सरकार सहमत नसल्याचं महसूलमंत्री खडसेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निवदेन करतील, अशी माहिती खडसे यांनी दिली. दरम्यान, या वादानंतर अणेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.


महाधिवक्त्यांनी न्यायालयात राज्याची भूमिका मांडायची असते. राज्याच्या प्रश्नांबाबत त्यांची वैयक्तिक मते असू शकतात. मात्र ती मतं जाहीरपणे मांडणं योग्य नाही. याबाबत आपण मंगळवारी निवेदन करणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.


 


डिसेंबरमध्ये नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना अणेंनी वेगळ्या विदर्भाबाबत वक्तव्य केलं होतं. तेव्हा ते अणेंचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली होती. मात्र आता शिवसेनेचा आक्रमकपणा आणि सर्व पक्षीय विरोध लक्षात घेता मुख्यमंत्र्यांना अणेंविरोधात भूमिका घेणं भाग पडणार असल्याचे चित्र आहे.