मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकीक स्मारक उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभू यांच्या उपस्थित मुंबई भाजपच्या ‘मी मुंबई’ या अभियानाची सुरुवात शुक्रवारी दादर येथील वैद्य सभागृहात झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा सत्कारही करण्यात आला. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.


दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुंबईत केलेल्या कामांचा आढावा घेतला. मुंबईसाठी एमयुटीपी-३ला मंजुरी, उन्नत रेल्वेमार्गाच्या कामाची पायाभरणी, आदी विविध कामे लवकरच सुरू होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


भाजपने केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली विकासाचा ध्यास घेऊन कामे करण्यास सुरुवात केली आहे. सुदैवाने मुंबईकरांसमोरही एक संधी चालून आली आहे. जर मुंबईचा विकास करायचा असेल, तर मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवा, असे थेट आवाहन सुरेश प्रभू यांनी केले. 


मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना त्याचीच तयारी म्हणून भाजपने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘मी मुंबई’ हे नवीन अभियान आहे. या अभियानाची सुरुवात रेल्वेने मुंबईत केलेल्या कामांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यापासून झाली.