मुंबई : राज्यात महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये 2012 चा फॉर्म्युला नाही तर विधानसभा 2014 च्या निवडणूक निकालांवर आधारित जागा वाटप बोलणी करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. असे असले तरी शिवसेनेशी युती करण्यावरच भर देणार असल्याचे भाजपने निश्चित केले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी भाजपची मुख्यमंत्र्यांचा बंगला 'वर्षा'वर पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री यांची बैठक झाली. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या पक्षीय ताकदीचा आढावा घेतला गेला. यावेळी बैठकीत स्थानिक पातळीवर युतीबाबत चर्चा सुरु करण्याचे आदेश दिले गेले आहेत.


राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरवर, मात्र काँग्रेस फक्त काही फरकाने मागे राहिला आहे. त्यामुळे युती झाली नाही तर काँग्रेसला यश मिळू शकते. तेव्हा यापुढे युती करत काँग्रेसला फायदा होऊ नये, अशी रणनीती आखण्यात आली आहे. सन्मानजनक युती करण्यावर मुख्यमंत्र्याचा आग्रह दिसत आहे. तसे त्यांनी ठाण्यातही बोलून दाखवले.


राज्यात काँग्रेसला धक्का द्यायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात हव्यात म्हणून भाजपाची ही रणनिती आहे, अशी भाजपच्या काही वरिष्ठांनी सांगितले. मात्र शिवसेनेशी बोलणी करताना 2012 नाही तर 2014 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला वॉर्डमध्ये मिळालेली आघाडी या फॉर्मुल्यावरच भाजपा वाटाघाटी करणार आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला शिवसेनेला पसंत पडला नाही तर युती होणार नाही, हेच स्पष्ट होत आहे.