जुन्यांच्या बदल्यात नव्या नोटा देण्यासाठी दलालांचा कोड भाषेत व्यवहार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोट बंद केल्याने आता जुन्या नोटांचे नव्या नोटांत रूपांतर करण्याचा धंदाही तेजीत आला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोट बंद केल्याने आता जुन्या नोटांचे नव्या नोटांत रूपांतर करण्याचा धंदाही तेजीत आला आहे. नोटा बदलून देणाऱ्या दलालांचं रॅकेट सक्रीय आहे. ITच्या डोळ्यात धूळ फेकण्याची शक्कल त्यांनी शोधून काढली आहे. त्यासाठी दलालांच्या कोड लँग्वेजमुळे यंत्रणांची धावपळ उडाळी आहे.
२५ ते ३५ टक्क्यांपर्यंत दलाली आकारून जुन्या नोटा बदलून देण्याची दुकानेच जणू दलाल उघडून बसलेत. एवढच नाही तर, या नोटाबंदीमुळे हवालाबाजारही तेजीत आलाय. आणि हे सर्व व्यवहार करताना इन्कम टॅक्स किंवा पोलीसांच्या तावडीत सापडू नये याकरिता या दलालांनी कोड भाषेत व्यवहार सुरु केले आहेत.
"गार्डन में कितने फ्लावर है..?" ब्लॅक मार्केटमध्ये हे वाक्य चांगलंच प्रचलित झाले आहे. या वाक्यानं आयकर विभागातल्या अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. हे नेमकं काय आहे, याचा शोध घेताघेता हाती आली काळ्याच्या पांढरा करणाऱ्या दलालांची कोड लँग्वेज. ५०० आणि १०००च्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर काळा पैसा कुणाच्याही नजरेत न येता बदलण्याचं मोठं आव्हान अनेकांसमोर आहे. त्यांच्या मदतीसाठी धावून आलेले दलाल ही खास भाषा वापरत आहेत.
८ नोव्हेंबरचा नोट बंदीचा निर्णय आणि २ डिसेंबर पासून ५००-१००० च्या नोटा चलनातून पुर्णता: बंद झाल्याने आता नोटा बदलून देणा-या दलालांचा भाव वधरला आहे. सुरुवातीला ५ ते १० टक्क्यांनी पैसे बदलून देणारे दलाल आता थेट २५ ते ३५ टक्के दलाली घेवून जुन्या नोटा बदलून देतायेत. पण यांत ही पकडले जाण्याची भीती असल्याने कोडवर्डचा वापर करुन हे दलाल यंत्रणांची दिशाभूल करत आहेत.
गार्डन मैं कितना फ्लावर है!
- गार्डन म्हणजे ज्या व्यक्तीकडेब जुन्या नोटा आहेत ती व्यक्ती आणि फ्लावर म्हणजे रुपये. या कोड भाषेनुसार गार्डन मैं कितने फ्लावर है याचा अर्थ "ज्या व्यक्तीकडे जुन्या नोटा आहेत त्याच्याकडे किती जुन्या नोटा आहेत"
- ५०० जुन्या नोटांना दलाल यलो फ्लॉवर म्हणतात
- नव्या ५०० नोटांसाठी ग्रीन व्हेजिटेबल्स हा शब्द वापरला जातो
- १०००च्या नोटेला रेड रोझ
आणि 2000च्या नव्या कोऱ्या नोटेला पिंक पेपर म्हटलं जात आहे.
गार्डनर म्हणजे ज्यांचाकडे जुन्या नोट आहेत ती व्यक्ती
तर जो नव्या नोटा उपलब्ध करून देणारे त्याला प्रिस्ट, म्हणजे पुजारी संबोधलं जात आहे.
मोबाईलवरून व्यवहार करताना या कोडवर्डचा वापर केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये २५ ते ३५ टक्के दक्षिणा घेऊन नव्या नोटांचा प्रसाद देणारे प्रिस्ट हे बॅंक, विमानतळ, रेल्वे, वीज देयक केंद्र आणि पेट्रोल पंपावरचे कर्मचारी असल्याचीच शक्यता आहे. खरं तर आता नोटा बदलांची दलाली ५० टक्क्यांवर येवून पोहोचलीये. आणि सोने देखील आता खरेदी करता येत नसल्याने काळा पैसा पांढरा करणाऱ्यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात ५० टक्के चढ्या दराने परेदशी चलन घेवून घ्यायला सुरुवात केली आहे.