अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचं धावत्या ट्रेनमध्ये झालेलं लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मुंब्र्यातल्या कौसर नावाच्या एका मुलीशी 2014 मध्ये अबू सालेमने धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर बराच वादंग झाला होता. आता पुन्हा या दोघांचे नवे फोटो समोर  आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने 2014 मध्ये धावत्या ट्रेनमध्ये केलेल्या लग्नामुळे मोठं वादळ निर्माण झालं होतं. स्वतः सालेमने मुंब्र्यातल्या कौसर नावाच्या मुलीसोबत आपले संबंध असल्याचं न्यायालयात कबूलही केलं होतं. एवढंच नाही तर या मुलीसोबत लग्न करण्याची परवानगीही न्यायालयाकडे मागितली होती.


 


फोटो सौजन्य - मीड डे डॉट कॉम

आता अबू सालेम आणि कौसर या दोघांचे नवे फोटो समोर आलेत. या नव्या फोटोंमुळे जेल प्रशासनाचा कारभार आणि अबू सालेमला एस्कॉर्ट करणा-या पोलीस टीमच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. 1993 च्या मुंबई साखळी स्फोटातला अबू सालेम महत्त्वाचा आरोपी आहे. अबू सालेम मोठा अंडरवर्ल्ड डॉनही आहे. असं असूनही सालेमला अशाप्रकारे सुविधा दिल्या जात आहेत. 2012 ते 2015 या दरम्यानचे सालेमचे हे फोटो असल्याचं बोललं जातंय. 


अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमवर अनेक गंभीर गुन्ह्यांसह 1993 च्या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. टाडा न्यायालयात सुरू असलेली त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. पण प्रत्यर्पण नियमानुसार अबू सालेमला मोठी शिक्षा दिली जाऊ शकत नाहीये. मात्र जेलमध्ये असूनही अबू सालेमचे अशाप्रकारे एका युवतीसोबत फोटो बाहेर आल्यामुळे जेल प्रशासन आणि पोलीस करतायत काय असा सवाल उपस्थित होतोय.