मुंबई : पाच दिवसाच्या पाहुणचारानंतर गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाचे विसर्जन करताना सावधानता बाळगा. आज पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. मात्र, दादर, गिरगाव चौपाटीवर जेलीफीशचे आक्रमण झाले आहे. समुद्रावर तेलतवंग आणि पाणी अचानक हिरवे झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या उत्साहानं आणि वाजतगाजत सोमवारी घरोघरी श्री गणरायाचं आगमन झाले. भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने लाडक्या बाप्पाची आराधना केली. आता पाच दिवसाचा पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या गावी पुन्हा जाणार आहेत. या विसर्जन सोहळ्यासाठी मुंबईत सर्व चौपाट्यांवर कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


तर दुसरीकडे चौपाट्यांसोबतच मुंबईत विविध ठिकाणी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आलीय. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवात मुंबईतील चौपाट्यांवर थैमान घालणार्‍या खतरनाक जेलीफिश माशा पुन्हा एकदा चौपाट्यांवर दाखल झाल्या आहेत. कुलाबा येथील बधवार पार्क येथे आणि दादरच्या समुद्रात किनार्‍यावरच हजारो ब्ल्यू जेलीफिश आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे गिरगाव चौपाटीवरही स्टिंग रेचा वावर आढळून आला आहे.


त्यामुळे गणपतींचे विसर्जन करताना गणेशभक्तांनो सावध राहा. समुद्रात स्टिंग रे आणि जेलीफिशचा धोका आहे. पाणी हिरवे दिसले तर समुद्रात उतरू नका. जीवरक्षकांची मदत घ्या आणि मगच बाप्पाचे विसर्जन करा. अन्यथा जेलीफिशचा डंख बसल्यास प्रचंड वेदना होतील.उद्या पाच दिवसांच्या गणेशांचे विसर्जन होणार आहे. 


कुलाब्यातही जेलीफिश आहे. दादरच्या समुद्रात प्रचंड हिरवे पाणी झाले आहे. तसेच त्यावर तेलाचे तवंगही मोठ्या प्रमाणावर आहेत. कीर्ती महाविद्यालय ते सोमवंशी हॉलपर्यंत जेलीफिश आल्या आहेच. या जेलीफिश निळ्या रंगाच्या असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ दादर चौपाटीच नव्हे तर कुलाब्याच्या समुद्रातही जेलीफिश आढळल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, दादर चौपाटीवर महापालिकेचे ३० जीवरक्षक तैनात असून १२० खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. शिवाय २५ ते ३० डॉक्टरांचा ताफा आणि चार रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. 


जेलीफिश कसे येतात?


समुद्राच्या पाण्याच्या वरच्या थराचे तापमान वाढले आणि हवामान बदलल्यावर जेलीफिश अंडी सोडण्यासाठी किनार्‍यावर येतात. सप्टेंबर ते ऑक्टोबर हा त्यांचा प्रजनन काळ असतो. त्यासाठी वातावरण पोषक असते. म्हणून जेलीफिश किनार्‍यावर येतात. 


काळजी घ्या!


– छोटे जेलीफिश विषारी नसतात. त्यांनी डंख मारल्यास वेदना होते, पण उपचार केल्यास वेदना शमते.
– मोठे जेलीफिश विषारी असतात. त्याने डंख मारल्यास जीवावर बेतू शकते.
– जेलीफिश चावल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जा आणि उपचार घ्या.
– जेलीफिशने डंख मारल्यास वेदना शमविण्यासाठी त्या जागेवर लिंबू, मीठ आणि चुना लावा.
– पाण्यात जाताना पायाला तेल लावून जा.


सावधानता बाळगा...


– खोल समुद्रात जाऊ नका
– ज्या ठिकाणी पाणी हिरवे दिसेल त्या ठिकाणी जाऊ नका. तिथे जेलीफिश असण्याचा धोका अधिक आहे.
– लहान मुलांना समुद्रात नेऊ नका.
– जेलीफिश चावल्यास घाबरू नका