मुंबई : सध्या गुरुवार - शुक्रवार - शनिवार - रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या आल्यानं साहजिकच मोकळा श्वास घेण्यासाठी मुंबईकर मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी व्याकूळ झालेले दिसतायत. शिवाय, चार-एक दिवस कुठेतरी फिरून आल्याचं समाधान वेगळंच... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याची परिणीती म्हणजे, मुंबई - पुण्याचा भलामोठा एक्सप्रेसवेवर ट्राफिक जॅम झालेलं पाहायला मिळतंय. सलग चार दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गाड्यांची संख्येला अचानक पूर आलाय. 


त्यामुळे, पुण्याकडे येणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतायत. 


धुलिवंदन, गुडफ्रायडे, चौथा शनिवार आणि रविवार असे सलग चार दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. लोणावळ्याजवळ अमृतांजन पुलानजिक वाहतूकीची गती मंदावत असल्यानं त्याचा परिणाम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर होतोय. 


दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत असल्याचे महामार्ग पोलिसांनी म्हटलंय.