खडसेच्या रामटेक बंगल्याबाबत धक्कादायक वास्तव्य उघड
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अद्याप रामटेक बंगला सोडला नाही, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अद्याप रामटेक बंगला सोडला नाही, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
बंगलाच्या भाड्याचे 15 .50 लाखांची थकबाकीही अदा करण्यात आलेली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांस वितरित केलेला शासकीय बंगला 'रामटेक' बाबत माहिती विचारली होती. त्याला उत्तर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने अनिल गलगली यांस कळविले की माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अद्याप पर्यंत 'रामटेक' बंगला शासनाच्या ताब्यात दिला नाही
4 जून 2016 रोजी राजीनामानंतर 19 जून 2016 रोजी त्यांस बंगला रिक्त करणे आवश्यक होते. माजी मंत्र्यांस पहिले 15 दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क असते त्यानंतर 3 महिन्यासाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फुट रु 25/- आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यासाठी रु 50/- इतका दंडनीय आकार निश्चित केला आहे.
शासनाने खडसे यांना 3 महिन्याची परवानगी दिली होती. खडसे हे वास्तव्य करीत असलेले शासकीय निवासस्थान 'रामटेक' बंगला वापरापोटी असलेली दिनांक 19 नोव्हेंबर 2016 पर्यंत थकबाकी रु 15,49, 975/- आहे.
सार्वजनिक बांधकामाच्या मलबार हिल सेवा केंद्राने दिनांक 17 नोव्हेंबर 2016 रोजी कळविले आहे की ना.दा. मार्ग येथील शासकीय बंगला 'रामटेक' येथे एकनाथ खडसे, माजी मंत्री यांनी दिनांक 19 नोव्हेंबर 2014 मध्यान्ह पूर्व पासून बंगल्याचा ताबा घेतला असून , अद्यापपर्यंत सदर बंगल्याचा रिक्त ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात दिलेला नाही.